शेतवस्तीवर चोरट्यांचा दरोडा; सोन्या, चांदीच्या दागिन्यासह एक लाख ५८ हजार रुपयांची चोरी

बाबासाहेब गोंटे
Monday, 14 September 2020

अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील शेतवस्तीवर चोरट्याने सोमवारी (ता.१४) पहाटे दीड वाजेच्या दरम्यान दरोडा टाकून सोन्या चांदीच्या दागिन्यासह मोबाईल, नगदी मिळून एक लाख ५८ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील शेतवस्तीवर चोरट्याने सोमवारी (ता.१४) पहाटे दीड वाजेच्या दरम्यान दरोडा टाकून सोन्या चांदीच्या दागिन्यासह मोबाईल, नगदी मिळून एक लाख ५८ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी पहाटे दीड वाजेच्या दरम्यान नवनीत बाबुराव लघाडे या शेतकऱ्याच्या शेतवस्तीवर सहा अज्ञात चोरट्याने दरोडा टाकला.

यामध्ये तीस हजार रुपये किमतीचे सोन्याची पोत, मनी, कानातील सोन्याची फुलं, ३४ हजार रूपयांचे दोन सोन्याचे डोरले, नाकातील टिकली, पायातील चांदीचे जोडवे, ८० हजार रुपयाचे सोन्याचे नेकलेस, मनी मंगळसूत्र, सोन्याची पोत, कानातील झुंबर, कानातील सोन्याचे हुजूर, नाकातील नथ, मुलाच्या हातातील चांदीचे दोन कडे, गळ्यातील सोन्याचा पत्ता, सहा हजार ५०० रुपयाचे दोन मोबाईल तसेच नगदी सातशे रुपये मिळून एक लाख ५८ हजार रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला आहे, अशी लेखी तक्रार अंबड येथील पोलीस ठाण्यात शेतकरी नवनीत लघाडे यांनी सोमवारी दिली.

गावांमधील आठवडे बाजारांना ब्रेक, छोट्या व्यावसायिकांची उपासमारी

या घटनेची माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय अधिकारी देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक भारत बलय्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ, शेतकरी यांच्या समक्ष पंचनामा केला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत बलय्या हे करत आहे. एकीकडे शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत असताना, त्यातच जागतिक कोरोना महामारीचे संकट पाठीशी लागल्याने अगोदरच भयभीत असताना चोरट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने ग्रामस्थ, शेतकरी यांना जगणेच कठीण होऊन बसले आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Lakh 58 Thousand Rupees Items Stolen Ambad News