बीड जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी पावसाची भरपाई 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

  • अवकाळी पाऊस, ‘सकाळ’चा यशस्वी पाठपुरावा 
  • शासनाकडून ७१ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी 
  • मुख्यमंत्र्यांनी मात्र भरपाईचा शब्द पाळलाच नाही 

बीड - मागील ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीपासून वंचित असलेल्या एक लाख तीन हजार शेतकऱ्यांना अखेर भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भरपाई देण्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला ७१ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी सोमवारी (ता. २९) मंजूर झाला. शेतकऱ्यांचा हा प्रश्न ‘सकाळ’ने बातम्यांच्या माध्यमातून लावून धरला.

दरम्यान, जिल्ह्यात आणि राज्यात या नुकसानीची पाहणी करून हेक्टरी ५० हजार रुपये भरपाईची घोषणा करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले. पण, त्यांचे आश्वासन त्यांनी पाळले नाही. जिल्ह्यात मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वादळ व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. मागच्या वर्षी अगोदरच पावसाने ओढा दिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यात या वादळामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला होता.

हेही वाचा - रोहयोत ठाण मांडलेल्या सव्वाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्ह्यातील आठ लाख २४ हजार शेतकऱ्यांच्या सात लाख ५६ हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले हेाते. यात १५ हजार हेक्टरांवरील फळबागांचेही नुकसान झाले होते. यापूर्वी सात लाख २३ हजार शेतकऱ्यांना ५६० कोटी रुपयांचे वाटप झाले होते. मात्र, एक लाख तीन हजार शेतकरी मागील सात महिन्यांपासून या मदतीपासून वंचित होते. शेतकऱ्यांचा हा प्रश्न आणि मदतीची मागणी ‘सकाळ’ने लावून धरली होती. अखेर सोमवारी महसूल व वनविभागाच्या एका आदेशान्वये शासनाने या निधीचे वितरण केले. जिल्ह्यासाठी ७१ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला भेटला आहे. 

मुख्यमंत्री घोषणा विसरले 
अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट सुरू होती. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी जिरायती पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये, तर फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी आवश्यक होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी बीड जिल्ह्यातही पाहणी केली. सरकार आल्यानंतर हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देऊ, अशी घोषणा केली होती. योगायोगाने श्री. ठाकरे मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीवर बसले. मात्र, भरपाईची रक्कम ही राज्यपालांच्याच घोषणेनुसार भेटली. त्यासाठीही सात महिन्यांचा कालावधी लोटला. मुख्यमंत्र्यांची ५० हजारांची घोषणा मात्र हवेत विरली. 

हेही वाचा - बीड क्राईम - जेवण, दारूस नकार, तलवार कत्तीने हल्ला

शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम भेटावी : सुरेश धस 
अगोदरच भरपाई भेटायला सात महिने लागले. आष्टी तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. सध्या शेतकरी चोहोबाजूने अडचणीत आला आहे. शासनाकडून निधी आला असला तरी शेतकऱ्यांच्या हाती लवकर पडावा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. प्रशासन व बँकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा शेतकऱ्यांची परवड होऊ नये, असेही धस म्हणाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh farmers in Beed district will get compensation for untimely rains