
लातूर जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी गावकुसातील कारभाऱ्यांमध्ये तेवढा उत्साह दिसून आला नाही.
लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी गावकुसातील कारभाऱ्यांमध्ये तेवढा उत्साह दिसून आला नाही. पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकच शेषेराव गणपती जोगदंड यांनी नळेगाव (ता. चाकूर) ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेसाठी अर्ज केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असले तरी दरम्यानच्या कालावधीतील २५, २६ व २७ डिसेंबर हे तीन दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज दाखल करता येणार नाहीत. यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस उरले असून सोमवार पासूनच (ता. २८) गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ४०८ ग्रामपंचायतीच्या तीन हजार ५४८ जागांसाठी निवडणूक होत असून यापैकी बुधवारी केवळ एका जागेसाठी एकच अर्ज आला आहे. सर्व ग्रामपंचायतींसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून इच्छुकांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे बंधन आहे.
Edited - Ganesh Pitekar