‘या’ जिल्ह्यात कांद्याची मागणी वाढली मात्र आवक घटली

राजेश दारव्हेकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

-दरवाढीचा फटका ग्राहकांना
-भाव साठ ते ऐंशी रूपये किलो

हिंगोली ः शहरात मागच्या काही दिवसांपासून कांद्याची आवक घटल्याने त्‍याचे भाव गगनाला भिडले आहेत. चंपाषष्ठीपासून अनेकांनी कांदे खाणे सुरू केल्याने बाजारात साठ ते ऐंशी रूपये किलोप्रमाणे त्‍याची विक्री होत असल्याने या भावाने नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
    शहरात असलेल्या भाजीमंडईत नांदेड, अकोला व नाशिकच्या बाजारपेठेतून कांद्याची आवक होते. मागच्या काही दिवसांपासून येथून येणाऱ्या कांद्याची आवक कमी झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने या पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच जून महिण्यात कांदा लागवड करताना देखील पाऊस उशिराने आल्याने लागवड कमी प्रमाणात झाल्याने कांद्याची आवक बाजारात कमी झाल्याने बाजारात विक्रीस येत असलेल्या कांद्याचे भाव वधारले आहेत.
अनेक जण आषाढीपासून कांदे, वांगे खाणे बंद करतात. त्‍यानंतर चंपाषष्‍ठीला खंडोबाची पूजा करून त्‍यांना कांदे वांग्याचे भरीत करून नैवद्य दाखविला जातो व त्‍यांनतर कांदे, वांगे खाणे सुरू होते. नुकतीच चंपाषष्ठी झाल्याने बाजारात कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चंपाषष्ठीला बाजारात बिगर पातीचे कांदे ऐंशी रूपये किलोप्रमाणे विकले जात होते. पातीचे कांदे देखील त्‍याचा भावात विकले जात होते.

तीन ते पाच टनाची झाली घट
सध्या बाजारात दररोज पाच ते सात टन कांद्याची आवक होत आहे. एरव्ही दहा ते पंधरा टन कांदा विक्रीसाठी येतो. मात्र, सध्या आवक घटल्याने कांद्याच्या भावावर त्‍याचा परिणाम होत आहे. शहरातील विविध हॉटेल, मेस यासह विविध ठिकाणी होणाऱ्या जेवनाच्या कार्यक्रमात कांद्याची मागणी असते तसेच शहरातून ठोक व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्रेते देखील कांद्याची खरेदी करतात. सध्या बाजारात कांद्याची आवक घटल्याने भावावर त्‍याचा परिणाम झाला असून साठ ते ऐंशी रूपये किलोप्रमाणे बाजारात कांदे विक्रीस येत आहेत.

परतीच्या पावसाने भाव वाढले
यावर्षी ग्रामीण भागातून विक्री येणाऱ्या कांद्याची आवक कमी झाली आहे. परतीच्या पावसाने या पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे कांद्याच्या भाववाढीवर त्‍याचा परिणाम झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. शहरातील भाजीमंडईत ग्रामीण भागातून देखील कांदे विक्रीस येतात. मात्र, यावर्षी त्‍याचे प्रमाण अत्‍यल्‍प असल्याने बाजारात विक्रीस आलेल्या कांदे व त्‍याच्या भावामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

कांद्याला मोठी मागणी
कांद्याची आवक घटल्याने त्‍याचा भाववाढीवर परिणाम झाला आहे. वीस रुपये किलोप्रमाणे विकले जाणारे कांदे साठ ते ऐंशी रूपयेप्रमाणे विकले जात आहेत. सध्या ग्राहकांची कांद्याला मोठी मागणी आहे. मात्र, ते उपलब्ध होत नसल्याने त्‍याचा भाववाढीवर परिणाम झाला आहे. 
- सय्यद शौकत, विक्रेते. 

मालच नसल्याने अडचणी
यावर्षी परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. जून महिण्यातदेखील पाऊस उशिराने झाल्याने लागवड कमी झाल्याने सध्या बाजारात येणाऱ्या कांद्यावर त्‍याचा परिणाम होत आहे. बाजारात त्‍याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, मालच नसल्याने अडचणी आहेत. 
-गणेश काळे, कांदा उत्‍पादक, शेतकरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion demand in 'this' district increased but incoming declined