सावधान! ऑनलाइन फसवणुकीचे फंडे वाढले, स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज

दत्ता देशमुख
Monday, 11 January 2021

सोशल मीडिया आणि स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

बीड : सोशल मीडियावरुन फसवणुकी बरोबरच आता ऑनलाइन फसवणुकीचे फंडे वाढले आहेत. दिवसेंदिवस यामध्ये अडकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच बरोबर अशा गुन्ह्यांत पोलिसांकडूनही फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या विभागानेही तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे.

‘तुम्हारे लिए हमारे पास जॉब है, तुमको भेजी गई लिंकपर तुम्हारा पुरा फॉर्म भरो, असे म्हणाल्यानंतर तरुणाने ती लिंक ओपन करताच त्याच्या खात्यातून ३१ हजार रुपये वळती झाल्याचा प्रकार तालुक्यातील आहेर वडगाव येथे समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सतीश बाबासाहेब शिंदे (वय ३७ ) यांना नोहेंबर महिन्यात एका महिलेने ९६३९०८५९२६ या मोबाईल क्रमांकावरून फोन केला. तुम्हारे लिए जॉब है, तुमको भेजी गई लिंकपर तुम्हारा पुरा फॉर्म भरो, असे म्हणून त्यांना एक लिंक पाठविण्यात आली.

सदरील फॉर्म भरण्याची फीस केवळ २६ रुपये आहे, असे सांगण्यात आले होते. त्यावेळी शिंदे यांनी ती लिंक ओपन करून फॉर्म भरण्यास सुरुवात केली, तो फार्म भरत असताना त्यांच्या क्रेडिट कार्डावरून ३१ हजार रुपये गायब झाल्याचे त्यांना कळाले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी त्यांनी बीड ग्रामीण पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा पुढील तपास पोलिस निरीक्षक साबळे करत आहेत.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

सर्रास ऑनलाइन फसवणूक
फेसबूकवरुन डमी अकाऊंट काढून संबंधीताच्या मित्र यादीतील लोकांना मेसेंजरमध्ये संपर्क साधून पैसे मागण्याचे प्रकार अलीकडे सर्रास वाढले आहेत. अशा फंडे करणारे निर्ढावलेले असल्याचे स्पष्ट आहे. त्याच बरोबर फोन करुन विविध अमिषे दाखवून लुटण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशा प्रकारांत फसणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच स्मार्टफोन वापर करणाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. फोनवरुन नोकरी, काही ऑफर देण्याच्या अमिषाकडे दुर्लक्ष करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे अशा प्रकरणांत फसवणूक झालेले व्यक्ती गुन्हे नोंद करण्यासही लवकर पुढे येत नसल्याचे वास्तव असले तरी गुन्ह्यात कोणी समोर आल्यानंतर त्याची पोलिस दखल घेतीलच असेही नाही. शक्यतो गुन्हा लवकर नोंद केला जात नाही किंवा गुन्हा नोंद झाला तर अशा व्यक्तींचा तपास लवकर लागत नाही. त्यामुळे आता चोहोबाजूने सतर्कतेची गरज आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Cheating Cases Hikes Beed Latest News