फुलंब्रीत सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाइन सातबारे बंद

नवनाथ इधाटे
गुरुवार, 5 जुलै 2018

फुलंब्री - तालुक्‍यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ऑनलाइन सातबाराचे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

फुलंब्री - तालुक्‍यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ऑनलाइन सातबाराचे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची विविध सेवा संस्थांमार्फत कर्ज मिळविण्याची लगबग सुरू आहे. या कर्जाच्या विश्वासावर शेतकरी हंगामाची मशागत करणे, बी-बियाणे खरेदी, खतांची खरेदी करून खरीप हंगामाच्या भरवशावर रब्बीकडे पाहून संसाराचा रहाटगाडा ओढण्याची जिद्द ठेवत असतो. परंतु, २४ मेपासून शासनाचे ‘महाभूलेख’ हे संकेतस्थळ हॅंग झाले आहे. त्यामुळे सातबारा उतारे शेतकऱ्यांना मिळविण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. जिल्हा बॅंकेकडून एप्रिल महिन्यात मिळणारे पीककर्ज मे महिना उलटला तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही. सातबारा मिळत नसल्यामुळे कर्जाला विलंब होत आहे.

प्रत्येक पीककर्ज घेण्यासाठी बॅंकेत सातबारा उताराची आवश्‍यकता असते. तालुक्‍याचा विचार करता ग्रामीण भागातील माहिती संकलन करून ती अद्ययावत करण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र ग्रामीण भागात नेट जोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सातबारा काढण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी यावे लागते. 

सध्या सातबारा वितरणाचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे तलाठ्यांनाही सातबारा वितरण करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने त्यांचे हॅंग झालेले संकेतस्थळ त्वरित सुरू करावे. अन्यथा त्याला पर्यायी सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकरी आक्रमक
सातबारा उतारा ऑनलाइन मिळत नाही. त्यात जुन्या उताऱ्यावर तलाठी सही देत नसल्याने जास्तीच्या अडचणी वाढत आहेत. ऑनलाइन सातबारा मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. ऑनलाइन समस्या लवकर न सुटल्यास आंदोलन करणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

पीककर्जाचे काम थांबले 
सध्या शेतकऱ्यांची पीककर्जासाठी धावपळ सुरू असून कोणत्याही बॅंकेसाठी सातबाऱ्याची आवश्‍यकता आहे. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाइन सातबाराचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना सातबारासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. बॅंकेतही बॅंक व्यवस्थापक सातबारा असल्याशिवाय उभे करत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परिणामी सातबारा उताऱ्याअभावी पीककर्जाचे काम थांबले आहे. 

Web Title: Online Satbara Close Internet Server Down