राज्यातील जिल्हा परिषदेत मनसेचा फक्त औरंगाबादेत एकमेव सदस्य 

राज्यातील जिल्हा परिषदेत मनसेचा फक्त औरंगाबादेत एकमेव सदस्य 

औरंगाबाद - महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाचा सुफडा साफ झालेला असताना जिल्हा परिषदेतही इंजिनची वाट लागली आहे. राज्यातील 25 जिल्हा परिषदांत फक्त औरंगाबादमध्ये मनसेचा एकमेव सदस्य विजयी झाला. विधानसभेत एक आमदार असलेल्या मनसेचा जिल्हा परिषदेतही फक्त एकच सदस्य आहे. 2012 मध्ये औरंगाबादेत ऐतिहासिक कामगिरी करीत 8 जागा जिंकून थेट सत्तेत गेलेल्या मनसेला यंदा अस्तित्वाची लढाई लढावी लागली. पक्षाला अनेक शिलेदार सोडून गेलेले असताना, औरंगाबादेत किमान भोपळा तरी फोडता आला. 

जिल्हा परिषद निवडणुकीत मनसेची महापालिकेप्रमाणेच दैना झाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत चाळीसवरून त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. मुंबईत 7, पुण्यात दोन, पिंपरी-चिंचवड मध्ये 1 अशा 15 जागा मिळाल्या आहेत. दहा पालिकांत मनसेचे इंजिन पटरीवरून उतरलेले असताना ग्रामीण भागातही मनसेची स्थिती अतिशय कमकुवत झाली आहे. गेल्या वेळी राज्यात फक्त औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसेने ऐतिहासिक कामगिरी करीत पहिल्यांदाच सत्तेत सहभाग घेतला होता. आठ जागा जिंकून किंगमेकर ठरलेल्या मनसेला 2017 मध्ये आपले अस्तित्व राखण्यासाठी झगडावे लागले. औरंगाबादेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती सुनील शिंदे यांनी सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. विद्यमान बांधकाम समिती सभापती यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला; मात्र त्यांच्या पत्नीचा कॉंग्रेसकडून शिल्लेगाव गटातून पराभव झाला आहे. माजी शिक्षण सभापती बबन कुंडारे यांनी मनसेचे इंजिन सोडून कॉंग्रेसचा हात धरला. 2017 मध्ये ते गोलटगाव गटातून कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. यामध्ये विद्यमान समाजकल्याण सभापती शीला चव्हाण यांचे पती मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांनी पैठण तालुक्‍यातील बिडकीन गटातून मनसेकडून विजय प्राप्त केला आहे. मात्र, शीला चव्हाण यांना आडूळ गटातून पराभव स्वीकारला लागला. याशिवाय मनसेचे जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर हे पाल गटातून पराभूत झाले. सात उमेदवार उभे करणाऱ्या मनसेला फक्त एकाच जागेवर विजय मिळविता आला आहे. 

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी मुंबईत भेट घेतली आहे. इतर नेत्यांसोबतसुद्धा भेट घेऊन चर्चा करणार आहे; मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेत कुणाला पाठिंबा द्यायचा, याची अद्याप चर्चा झालेली नाही. पक्ष जो आदेश देईल तो मान्य राहील. 
- विजय चव्हाण (जिल्हा परिषद सदस्य, मनसे, औरंगाबाद) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com