
लातूर येथील औसा रस्त्याने सांगोल्याकडे जाणाऱ्या एका कारवर बुधोडा (ता. औसा) येथे दोघांनी दगडफेक केली. त्यामुळे कार चालकाने खाली उतरून या दोघांकडे गेला. त्यावर त्याला मारहाण करण्यात आली.
लातूर : येथील औसा रस्त्याने सांगोल्याकडे जाणाऱ्या एका कारवर बुधोडा (ता. औसा) येथे दोघांनी दगडफेक केली. त्यामुळे कार चालकाने खाली उतरून या दोघांकडे गेला. त्यावर त्याला मारहाण करण्यात आली. यात कार चालकाने स्वसरंक्षणार्थ रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केल्याने एक जण पळून गेला. एकाला पकडण्यात यश आले. पकडलेली व्यक्ती ही दारूच्या नशेत होती. ही घटना शुक्रवारी (ता. चार) पहाटे घडली. बुधोडा शुक्रवारी पहाटे सिद्धेश्वर दशरथ जाधव (रा. सांगोला) हे लातूर येथून सांगोल्याकडे जात होते. बुधोडा येथे रस्त्यावर दोन व्यक्ती त्यांच्या कारसमोर आल्या.
एकाच्या हातात लाठी व दुसऱ्याच्या हातात दगड होते. त्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. वाहन न थांबल्याने दगड फेकून वाहनावर मारला. श्री. जाधव यांनी कार थोडी पुढे नेली. त्यानंतर परवाना असलेली रिव्हॉल्व्हर घेऊन त्यांनी कार वळवली. त्या दोन्ही व्यक्तीजवळ ते आले. तुम्ही दगड का मारले विचारत असताना त्यांच्यात झटापट झाली. धक्काबुक्की करण्यात आल्याने श्री. जाधव यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वसरंक्षणार्थ एक गोळी हवेत फायर केली. त्यामुळे एक व्यक्ती पळून गेली.
दुसऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. तेवढ्यात दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंगचे वाहन तेथे आले. पोलिसांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले. त्याने संगमेश्वर व्यंकट कांबळे (वय २६ रा. बुधोडा) असे सांगितले व दुसरा पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव लहू गायकवाड (रा. बुधोडा) असे सांगितले. पेट्रोलिंग जीप व श्री. जाधव यांनी संगमेश्वर यास औसा पोलिस स्टेशनला नेले. तो दारू पिलेला असल्याने त्याची मेडिकल तपासणी करण्यात आली. तो दारू पिला असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिलेले आहे. लहू गायकवाड याचा त्याचे घरी बुधोडा येथे शोध घेतला असता तो सापडला नाही. या प्रकरणी औसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादन - गणेश पिटेकर