
डोंगरकिन्ही (ता.पाटोदा) येथील बसस्थानक परिसरात बुधवारी (ता. २३) अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.
डोंगरकिन्ही (जि.बीड) : डोंगरकिन्ही (ता.पाटोदा) येथील बसस्थानक परिसरात बुधवारी (ता. २३) अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. डोंगरकिन्ही गावातुन बीड-नगर-कल्याण व पंढरपूर-पैठण हे दोन महामार्ग गेले आहेत. त्यामुळे महामार्गालगतच्या जागांना सोन्याचे भाव आले आहेत. त्यातुनच अधुन मधून जागेचे वाद उपस्थित होत असतात. बहुतेक जुन्या खरेदी चतुर्सीमा नुसार न होता हिस्सेवारी नुसार झाल्या आहेत. बसस्थानका लगतच्या सर्हे नं. २०३ च्या वादाचे पर्यवसान बुधवारी दुपारी चारच्या सुमारास गोळीबारात झाले.
बसस्थानक परिसरात बाहेर गावाहून एक जे. सी. बी. मशीन व जवळपास पंचवीस जीप गाड्यातून काही अज्ञात व्यक्ती जागेचा ताबा घेण्यासाठी आले. मात्र स्थानिकच्या पन्नास साठ लोकांनी त्यांना आडवले. दोन्ही बाजूने काठ्यांचा मारा व दगडांचा वर्षाव सुरू झाला. हे पाहून बाहेर गावाहून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार करुन पळ काढला. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार डोंगरकिन्हीला मिळाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावातील तंटामुक्त समितीचे काम बंद आहे. जागेचे भाव गगनाला भिडले आहेत.
त्यातल्या त्यात रस्त्यासाठी अतिक्रमण हटविल्याने जागेचे वाद विकोपाला जाऊ लागले आहेत. बुधवारी या वादाचा गोळीबारात शेवट झाला. मोठी दंगल होता- होता राहिली. अंमळनेर पोलीस घोषणेची माहिती मिळताच दाखल झाले. त्यांनी पिस्तूलच्या वापरलेल्या चार गोळ्या, लाकडी दांडे, मिरची पूड असलेली पिशवी रस्त्यावरून हस्तगत केली आहे. रस्त्यालगतच्या दुकानांतून सी. सी. टीव्ही चे फुटेजचे रेकॉर्डिंगही अंमळनेर पोलीसांनी मिळवले आहे.