औरंगाबाद : उद्यापासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE

औरंगाबाद : उद्यापासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी

औरंगाबाद - आरटीई प्रवेशासाठीची पहिली फेरी पूर्ण झाली असून, आता उर्वरित रिक्त जागांवरील प्रवेश आणि प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मंगळवारपासून (ता. १७) सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा. यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यातंर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, १० मे रोजी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पहिली फेरी संपली. यंदा प्रवेशासाठी ५७५ शाळा पात्र ठरल्या असून, ४ हजार ३०१ जागांसाठी १७ हजार २२१ अर्ज आले आहेत. यापैकी पहिल्या ड्रॉ मध्ये ४ हजार १९३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी २ हजार ७१० जणांचेच प्रवेश निश्चित झाले असून, १ हजार ३८८ जागा रिक्त आहेत.

पात्र शाळांना प्रवेशानंतर उर्वरित रिक्त जागांची माहिती देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदतही शुक्रवारी १३ मे रोजी संपली आहे. आता उर्वरित जागा आणि प्रतीक्षा यादीतील पालकांच्या पाल्यास प्रवेशासाठी मंगळवारी (ता.१७ मे) रोजी एसएमएसद्वारे प्रवेशाची पुढील प्रक्रिया कळविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.