शेतकऱ्याने जिद्दीने माळरानावर फुलविली फळबाग

राजेश दारव्हेकर
शुक्रवार, 29 मे 2020

चोंढी बहिरोबा (ता. वसमत) येथील शेतकऱ्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळे अस्तरीकरण करून पावसाळ्यातील पाणी शेततळ्यात साठवून ठेवले. हे पाणी तिन्ही हंगामात पुरेल याची व्यवस्था झाल्याने फळबाग फुलण्यास मदत झाली आहे. 

 

हिंगोली: चोंढी बहिरोबा (ता. वसमत) येथील शेतकऱ्याने शेततळ्याच्या माध्यमातून हंगामी पाणी व्यवस्‍थापन करून जिद्दीने खडकाळ जमिनीवर सीताळफ व पेरूची बाग फुलविली आहे. त्यामुळे ओसाड असलेला भाग हिरवाईने नटला आहे.

चोंढी बहिरोबा (ता. वसमत) येथील गणेशराव मुदनर यांची बारा एकर शेती माळरानावर आहे. पावसाच्या पाण्यावर पिकाचे शेती अवलंबून असल्याने उत्पन्नाची फारशी हमी नव्हती. त्यामुळे शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून कृषी सहायक मनोज लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेततळे घेतले. 

हेही वाचाहिंगोली जिल्ह्यात आढळले चार मानवी सांगाडे

फळबाग घेण्याचा निर्णय

तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळे अस्तरीकरण करून पावसाळ्यातील पाणी शेततळ्यात साठवून ठेवले. हे पाणी तिन्ही हंगामात पुरेल याची व्यवस्था झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे त्यांनी माळरानावर फळबाग घेण्याचा निर्णय घेतला. भाऊसाहेब पुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत शंभर टक्‍के अनुदानावर हळद व सोयाबीन पिकात सीताफळ आणि पेरू बागेची लागवड केली.

पाण्याने उत्पादनात झाली वाढ 

 ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन केले. यामुळे जवळपास सर्वच क्षेत्र पाण्याखाली आणून विविध पिके घेऊन उत्पादनात वाढ केली. उन्हाळ्यातदेखील शेततळ्याचे पाणी पुरल्याने चार एकरवरील पेरू व सीताफळाची बाग टिकविण्यात त्यांना यश आले. श्री. मुदनर यांना जुनी सामाईक विहीर व एक बोअर आहे.

सहा एकर क्षेत्र बागायती

 परंतु, पाणी वर्षभर पुरत नसल्याने त्यांनी फळबाग करण्याचा नाद सोडून दिला होता. आता मात्र, आठ लाख ७६ हजार लीटर क्षमतेचे शेततळे घेतले आहे. बोअरचे पाणी विहिरीत सोडण्यापेक्षा शेततळ्यातच सोडले जात आहे. त्यामुळे ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होत आहे. शिवाय सहा एकर क्षेत्र बागायती पिकाखाली आले आहे.

येथे क्लिक करा - तलाठी दुसऱ्यांदा अडकला एसीबीच्या जाळ्यात, कुठे? ते वाचाच

जिद्दीने शेतात काम

 तालुका कृषी अधिकारी श्री. कल्याणपाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक श्री. राठोड, कृषी सहायक श्री. लोंखडे यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे श्री. मुदनर यांनी सांगितले. यातून उत्पन्न वाढीस मदत झाल्याने जिद्दीने शेतात काम करीत असल्याचे ते म्हणाले.

इतरही शेतकऱ्यांना लाभ 

कृषी विभागाच्या योजनांमुळे माझ्यासह गावातील इतरही काही शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. सध्या एक एकर सीताफळ, दीड एकरवर पेरू पिकाची लागवड केली आहे. तसेच इतर क्षेत्रावर बागायती पिके घेत असून नुकतीच हळद काढणी झाली. यातदेखील चांगले उत्‍पन्न मिळाले आहे.
-गणेश मुदनर, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orchards Planted By Farmers Hingoli News