coronavirus : बसगाड्या दररोज स्वच्छ करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

बीड जिल्ह्यात खासगी वाहतूक सेवेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बसची निर्जंतुकीकरण करून काळजी घेतली जावी. यासाठी दररोज बसची अंतर्गत स्वच्छता (सॅनिटायझेशन) करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

बीड - कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी प्रवासी वाहतूकदार संघटनेच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सूचना केल्या.

जिल्ह्यात खासगी वाहतूक सेवेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बसची निर्जंतुकीकरण करून काळजी घेतली जावी. यासाठी दररोज बसची अंतर्गत स्वच्छता (सॅनिटायझेशन) करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. याचबरोबर या प्रवाशांची माहिती व संपर्क क्रमांक प्रशासनात उपलब्ध करून दिले जावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. खासगी बसबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही व साध्या बसमधून देखील हीच काळजी घेतली जावी, असे ते म्हणाले 

हेही वाचा - परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर 31 मार्चपर्यंत बंद

अधिकारी-अभ्यागतांच्या भेटीही बंद 
विविध कामांसाठी अभ्यागत अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जातात. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून आता अधिकाऱ्यांनी अभ्यागतांना 31 मार्चपर्यंत भेट देऊन नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावार यांनी निर्गमित केले आहे. सोमवारी (ता. 16) विविध 60 विभागप्रमुखांना हे आदेश बजाविण्यात आले. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षकांसह 60 विभागप्रमुखांचा समावेश आहे. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दर्शन टाळण्याचे आवाहन 
जिल्ह्यातील परळी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैद्यनाथाचे मंदिर तसेच कपिलधार येथील मन्मथस्वामी यांचे मंदिर, अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे मंदिर, नारायणगड आदी ठिकाणी भाविकांची नेहमी गर्दी असते; परंतु कोरोना व्हायरस संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दर्शनासाठी जाण्याचे भाविकांनी टाळावे, असे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर नागरिकांनी जाऊ नये; तसेच यात्रा, धार्मिक उत्सव यांचेही आयोजन या कालावधीत केले जाऊ नये, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to clean the buses daily