औरंगाबादेतील 18 जलतरण तलाव बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

- पाणी टंचाईमुळे घेण्यात आला हा निर्णय.

औरंगाबाद : शहरातील भीषण पाणी टंचाईमुळे महापालिकेने सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खासगी 18 जलतरण तलाव बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. तहसील कार्यालयाने या नोटिसा बजावल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहरात गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे जलतरण तलावांमध्ये कोट्यवधी लिटर पाण्याचा वापर सुरू होता. त्याविरोधात ओरड सुरू होताच महापालिकेने दोन आठवडाभरापूर्वी सिद्धार्थ जलतरण तलाव बंद केला. या तलावासाठी रोज दीड लाख लिटर पाण्याचा वापर सुरू होता. हे पाणी आता नागरिकांना मिळणार आहे. त्यापाठोपाठ महापालिकेने शहरातील खासगी जलतरण तलावांची यादी तयार केली. हे तलावही बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला शिफारस केली होती.

या पार्श्‍वभूमीवर तहसील कार्यालयाने शहरातील हॉटेलांमधील जलतरण तलाव बंद करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. पाणीटंचाई दूर होत नाही तोपर्यंत हे तलाव बंद ठेवावेत, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Order of closure of 18 Swimming Pools in Aurangabad