अपघातातील मृतांच्या वारसांना 67 लाखांचा मावेजा देण्याचे आदेश

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 7 जुलै 2018

ट्रक व मोटारसायकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या वारसांना सुमारे 67 लाखांचा मावेजा विमा कंपनीने व्याजासह द्यावा, असे आदेश मोटार अपघात प्राधिकरणचे आणि जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात व न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी गुरूवारी (ता. 5) दिले.

नांदेड : ट्रक व मोटारसायकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या वारसांना सुमारे 67 लाखांचा मावेजा विमा कंपनीने व्याजासह द्यावा, असे आदेश मोटार अपघात प्राधिकरणचे आणि जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात व न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी गुरूवारी (ता. 5) दिले.

बिलोली तालुक्यातील किन्हाळा येथील मयत हमाल रामचंद्र नागोराव खराटे (वय 30), मयत शिक्षक शंकर दत्तात्रय लष्करे (वय 35) हे दोघेजण 7 जून 2011 रोजी किन्हाळा ते देगलूर दुचाकी (क्र.एम.एच.26 जे-5397)ने जात होते. देगलूर शहराजवळील लेंडी नदीच्या पुलावर मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक (क्र.पी.बी.-10 बी.ई.5830) या चालकाने दुचाकीला जबर धडक मारली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. ट्रकचालक ट्रकसह फरार झाला.

याप्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मयताच्या वारसांनी मोटार अपघात मावेजा कायद्याअंतर्गत स्वतंत्र दावे दाखल केले होते. याप्रकरणी मोटार अपघात प्राधिकरण आणि जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात व न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयाने सर्व साक्षी-पुरावे तपासून न्या. खरात यांनी शिक्षक असलेल्या शंकर लष्करे यांच्या वारसाला नॅशनल इन्शुरन्स कंपनीने मावेजापोटी 36 लाख 43 हजार 720 रुपये सात टक्के व्याज व खर्चासह द्यावेत असे आदेश दिले.

तसेच न्या. मांडे यांनी हमाल असलेल्या रामचंद्र खराटे यांच्या वारसास 9 लाख 88 हजार रुपये नऊ टक्के व्याज व खर्चासह द्यावेत, असे आदेश दिले. असे दोन्ही मयताच्या वारसांना व्याज व कोर्ट खर्चासह 67 लाखांचा मावेजा मंजूर केला आहे. याप्रकरणी मयताच्या वारसाकडून मुमताजअली कादरी, सज्जादअली कादरी यांनी बाजू मांडली. तर विमा कंपनीच्या वतीने श्रीनिवास मद्दे यांनी बाजू मांडली.

Web Title: Order to give the recipients of the death to 67 lakhs