उस्मानाबाद जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आदेश, काय आहे प्रकरण वाचा...?

सयाजी शेळके
Friday, 11 September 2020

अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने याची पूर्ण चौकशी करून अहवाल सादर केला. यामध्ये १९८० पर्यंतही पुरातन आणि मौल्यवान दागिने मंदिर संस्थांच्या ताब्यात असल्याचे दिसून आलं.

उस्मानाबाद :  तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान दागिने आणि नाणी गायब केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुरुवारी (ता. १०) दिले आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की तुळजाभवानीचे पुजारी किशोर गंगणे यांनी ९ मे २०१९ रोजी तक्रार दिली होती.  तुळजाभवानीचे काही मौल्यवान दागिने आणि नाणी मंदिर प्रशासनाच्या ताब्यातून गायब झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.  त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीप मुधोळ मुंढे यांनी या प्रकरणात चौकशी समिती नेमली. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने याची पूर्ण चौकशी करून अहवाल सादर केला. यामध्ये १९८० पर्यंतही पुरातन आणि मौल्यवान दागिने मंदिर संस्थांच्या ताब्यात असल्याचे दिसून आलं. मात्र त्यानंतर २००५ आणि २०१८ मध्ये या दागिन्याचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये सुमारे ७१ नाणी आणि काही पुरातन मौल्यवान दागिने गायब असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तत्कालीन मंदिर प्रशासन अधिकारी दिलीप नाईकवाडी यास जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री दिवेगावकर यांनी मंदिर प्रशासनाच्या तहसीलदारांना दिले आहेत.

हेही वाचा - उस्मानाबाद कोरोना अपडेट : दिवसभरात १८२ पॉझिटिव्ह; पाच बाधितांचा मृत्यू -

जगभरातील मौल्यवान दागिने

आई तुळजाभवानीच्या चरणी अनेक राजे राजवाड्यांनी मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. यामध्ये निजाम, औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज अशा मोठ्या घराण्यांनी देवीला दागिने त्याची नोंद तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडे आहे. अश्या या मौल्यवान दागिन्यांचे मूल्य जगामध्ये कुठेही करता येत नाही. एवढे अमूल्य असे काही दागिने गायब झाले असल्याचे दिसून येत आहे. तसेच ७१ नाणीही ताब्यातून गायब झाली आहेत.

गुन्हा दाखल होईल? 

अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौकशीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दीपा मुधोळ मुंडे यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र देऊनही गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे आता तरी या प्रकरणात गुन्हे दाखल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथे क्लिक कराअँटिजेनच्या नावाखाली रुग्णांची लूट; सह्याद्री ला जिल्हाधिकऱ्यांनी बजावली नोटीस ! -

सूत्रधार कोण?

देवीची मौल्यवान दागिने कुठे गेले? कोणी विकत घेतली? आणि कधी हा प्रकार घडला याची चौकशी होऊन संबंधित खरा सूत्रधारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन यामध्ये लक्ष देऊन चौकशी करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरा सूत्रधार मिळणार का याकडे तुळजाभवानीच्या भक्तांना आस लागली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे, नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order given by Osmanabad District Collector, read the case usmanabad news