महिलांनी साकारले कचरामुक्तीचे ‘स्वप्न’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

कचऱ्यापासून खतनिर्मिती सहज शक्‍य आहे. केवळ मानसिकता तयार करण्याची गरज आहे. विनाकटकट ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे प्रत्येक महिलेने ओल्या कचऱ्याचे खत तयार करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. 
- जयश्री देगवे

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने महापालिका त्रस्त असताना, गारखेडा परिसरातील स्वप्ननगरीतील जयश्री देगवे यांनी घरगुती पद्धतीने खताची निर्मिती करून स्वत:ची सुटका केली. त्यासोबतच त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींचाही कचऱ्याच्या फेरा सोडविला.  

शहरात गेल्या वर्षापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. महापालिका अजूनही कचऱ्याच्या प्रश्‍नात अडकून आहे. दुसरीकडे काही नागरिकही कचरामुक्तीसाठी प्रयत्नरत आहेत. यात स्वप्ननगरी येथील जयश्री देगवे यांनी घरातील ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खतनिर्मितीला सुरवात केली. शहरात मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते, शेतकऱ्याची मुलगी म्हणून अन्न वाया जाणे ही क्‍लेशदायक बाब होती. म्हणूनच खराब झालेले अन्न वाया जाऊ नये आणि घरातील कचरा घरातच जिरवता यावा म्हणून बी. डी. भुमकर यांची मदत घेतली. त्यांनी कचऱ्यापासून खत कसे करावे, याची माहिती दिली, तेव्हापासून म्हणजे दोन वर्षांपासून घरातील कचऱ्यापासून खत तयार करणे सुरू केल्याचे श्रीमती देगवे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन वैशाली सुरासे, संगीता फटाले, डॉ. शीतल नवले यांच्यासह अनेक महिलांनी घरीच खत बनविण्यास प्रारंभ केला. आता ही संख्या प्रचंड वाढत आहे. 

अशी आहे पद्धत 
कचरामुक्तीसाठी एका कुटुंबाला साधारण शंभर लिटरचा ड्रम आवश्‍यक आहे. ड्रमला एक सेंटिमीटरच्या अंतराने हवा खेळती राहील यासाठी असंख्य छिद्रे पाडावी लागतात. सुरवातीला ड्रममध्ये तळ झाकेल एवढी माती टाकावी, त्यानंतर घरातील ओला कचरा पसरवून टाकावा, त्यानंतर पुन्हा मातीचा थर द्यावा लागतो. ही क्रिया ड्रम भरेपर्यंत सुरू ठेवावी लागते. ड्रम भरल्यानंतर पुढे पुन्हा ३० ते ३५ दिवस ड्रम झाकून ठेवावा आणि दुसऱ्या ड्रममध्ये खताच्या प्रक्रियेला सुरवात करावी. दुसरा ड्रम भरेपर्यंत पहिल्या ड्रममध्ये खत तयार झालेले असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organic Fertilizer Women Garbage Free Success Motivation