उस्मानाबाद : दरोडेखोरांचा अक्षरश धुमाकूळ; धारदार शस्त्राने कुटुंबांवर हल्ला, तीन जण गंभीर जखमी

नेताजी नलवडे
Sunday, 14 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी पहाटेच्या वेळेला दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. एक नव्हे तब्बल तीन ते चार घरांमध्ये चोरी केली. तर ज्या ज्या घरात कुतुंबतील लोक जागे झाले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तीन जण गंभीर जखमी झाले.

वाशी (जि. उस्मानाबाद) : चोरी करताना जागे झालेल्या घरातील व्यक्तींवर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात पती -पत्नीसह अन्य एक असे तीन जण गंभीर जखमी झाले. पारगाव (ता. वाशी) येथे रविवारी (ता.१४) पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. 

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने संपूर्ण गावात भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानतंर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
पारगाव येथे रविवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव आखाडे यांच्या घरात चोरीच्या प्रयत्नाने प्रवेश केला. मात्र यावेळी श्री.आखाडे हे जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर अण्णासाहेब मनोहर डोके (वय ५०) यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
येथेही श्री. डोके हे जागे झाल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. मात्र चोरट्यांनी श्री. डोके यांना धारदार शस्ञाने डोक्यावर जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. तेथून चोरट्यांनी पळ काढून भुसार मालाचे व्यापारी अरुण मोटे यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करत असतानाच दरोडेखोरांनी चाहुल लागल्याने श्री. मोटे व त्यांच्या पत्नी कालिंदा मोटे या झोपेतुन जागी झाल्या. घरातील श्री. मोटे दांम्पत्य जागे झाले असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी या पती- पत्नीवर धारदार शस्ञाने हल्ला केला.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

या हल्यात अरुण दगडू मोटे (वय ५५), कालिंदा अरुण मोटे (वय ५०) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, या दोघांना व श्री. डोके यांना तातडीने बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
यावेळी दरोडेखोरांनी परिसरातील सर्व घरांना बाहेरुन कड्या लावून नागरिकांना घरात कोंडून टाकले होते. घडलेल्या या चोरीच्या घटनेत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

या घटनेची माहिती मिळाल्यानतंर वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. कुटुंबातील सर्वच जण रुग्णालयात असल्याने घरातून काय -काय चोरीला गेले आहे, याची माहिती अद्यापपर्यंत मिळु शकलेली नाही. एकाच रात्रीत चोरट्यांनी पारगावमध्ये धुमाकूळ घालून तिघांना मारहाण केल्यामुळे पारगावमधील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: osamanbad Attacks on families with sharp weapons three seriously injured