दूध, शेतमालाची वाहतूक रोखली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

उस्मानाबाद - शेतकऱ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशी रविवारी (ता.४) सुरूच होते. शहराकडे जाणारी शेतमालाची वाहतूक रोखल्याने दूध, भाजीपाला, अन्नधान्याचा पुरवठा झाला नाही. जिल्ह्यातून विविध महानगरांकडे जाणाऱ्या लाखो लिटर दुधाचे संकलन झालेच नाही.

चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

उस्मानाबाद - शेतकऱ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशी रविवारी (ता.४) सुरूच होते. शहराकडे जाणारी शेतमालाची वाहतूक रोखल्याने दूध, भाजीपाला, अन्नधान्याचा पुरवठा झाला नाही. जिल्ह्यातून विविध महानगरांकडे जाणाऱ्या लाखो लिटर दुधाचे संकलन झालेच नाही.

दुधाच्या उत्पादनात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर आहे. दररोज जिल्ह्यात पाच ते साडेपाच लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. यातील बहुतांश दूध विविध महानगरांकडे पाठविले जाते. तसेच स्थानिक खवा भट्टीलाही मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा केला जातो. शेतकरी संपामुळे दूध पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील संपूर्ण संकलनच ठप्प झाले आहे. त्यामुळे महानगराकडे जाणारा दुधाचा पुरवठा रोखला गेला आहे. तसेच खवा तयार करणाऱ्या भट्ट्याही बंद आहेत. दूध संकलन करू नये, अशा सूचना प्रत्येक केंद्रांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाखो लिटर दुधाचा व्यवसाय ठप्प झाला आहे. 

दूध समूहाचे संकलन बंद
खव्याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातून दूध संकलन करणाऱ्या दूध व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. सोनई, प्रभात, वारणा, गोविंद, मस्कती आदी बाहेरच्या जिल्ह्यातील दूध व्यावसायिक जिल्ह्यातून दुधाचे संकलन करतात. या सर्वच समूहांकडे जाणारे दुधाचे टॅंकर शेतकऱ्यांनी अडविले आहेत. त्यामुळे या समूहांना होणारा दुधाचा पुरवठा बंद झाला आहे. 

भाजीपालाही मिळेना

दुधासह शहरातील भाजीबाजारही शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. ग्रामीण भागातूनच मालाची आवक होत नसल्याने शहरात भाजीपाल्याची टंचाई जाणवत आहे. काही शेतकरी मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद अशा ठिकाणीही भाजीपाला विक्रीसाठी पाठवितात. परंतु सर्वच ठिकाणचे व्यवहार ठप्प असल्याने शहरात भाजीपालाही मिळत नाही.

शहरातही दूध मिळेना
शहरात येणारा दुधाचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील छोट्या दूध केंद्रांवर तुटवडा जाणवत आहे. तुरळक केंद्रावर आलेले दूध काही क्षणात संपत असल्याचे ग्राहक सांगत आहेत. तर बहुतांश दूध विक्री केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे शहरातील अनेकांच्या तोंडचे दूध पळाले आहे. 

Web Title: osmabad marathwada news milk, agriculture goods transport stop