esakal | लॉकडाऊनमुळे ६६२ प्रशिक्षणार्थी अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

बावी (ता. उस्मानाबाद) : आश्रमशाळेमध्ये निवासासाठी दाखल करण्यात आलेले परप्रांतीय विद्यार्थी.

प्रशासनाने उस्मानाबाद तालुक्यातील दोन आश्रमशाळांमधील वसतिगृहांमध्ये रविवारपासून (ता. २९) या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केली आहे.

लॉकडाऊनमुळे ६६२ प्रशिक्षणार्थी अडकले

sakal_logo
By
राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : एका खासगी कंपनीकडून मार्केटिंगच्या प्रशिक्षणासाठी उस्मानाबादेत आलेले पाच राज्यांतील ६६२ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे शहरातच अडकून पडले आहेत. या सर्वांच्या निवासाची सोय करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. प्रशासनाने उस्मानाबाद तालुक्यातील दोन आश्रमशाळांमधील वसतिगृहांमध्ये रविवारपासून (ता. २९) या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केली आहे.

उस्मानाबाद शहरात मार्केटिंगच्या प्रशिक्षणासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या पाच राज्यांतील जवळपास ६६२ विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना आपल्या राज्यात जाता आले नाही. शहरातील सांजा रोड, सांजा परिसरातील घरांमध्ये किरायाने हे विद्यार्थी राहत होते. एका-एका खोलीमध्ये १० ते १५ याप्रमाणे हे विद्यार्थी गर्दी करून राहत होते.

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

हे सर्व विद्यार्थी एकत्रित राहत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने शनिवारी तातडीने हालचाली सुरू केल्या. एकाच ठिकाणी सर्वांनी गर्दी करून राहू नये म्हणून व सुरक्षिततेच्या कारणास्तव या विद्यार्थ्यांच्या निवासाची वेगवेगळ्या ठिकाणी सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बावी (ता. उस्मानाबाद) येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात ७८ विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली. याशिवाय शिंगोली (ता. उस्मानाबाद) येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहातही रविवारी (ता. २९) काही विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली. उर्वरित विद्यार्थ्यांची सोय ते किरायाने सध्या राहत असलेल्या ठिकाणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

एका खोलीमध्ये किमान तीन ते चार विद्यार्थी याप्रमाणे या विद्यार्थ्यांना राहण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित ठिकाणी राहण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची सोय करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, शनिवारपासून यापैकी ७८ विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय बावी येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात करण्यात आली आहे, असे या आश्रमशाळेचे प्राचार्य दयानंद राठोड यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

हे सर्व विद्यार्थी एक खासगी कंपनीच्या वतीने मार्केटिंगच्या प्रशिक्षणासाठी उस्मानाबाद शहरात आले असल्याचे सांगण्यात आले. बावी येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात जवळपास १५ खोल्यांमध्ये या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांच्या निवासाची सोय झाली असली तरी शनिवारी व रविवारी या विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बावीचे तलाठी अमोल निरफळ यांनी काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने या विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय व्हावी, यासाठी प्रयत्न केला.

दरम्यान, शिंगोली येथील विद्यानिकेतन आश्रमशाळेत परप्रांतीय विद्यार्थ्यांची निवासाची सोय करण्यात आली असून, या विद्यार्थ्यांच्या जेवणाची जबाबदारी रूपामाता उद्योग समुहाकडे सोपविण्यात आली आहे. रविवारपासून (ता. २९) येत्या १४ एप्रिलपर्यंत रूपामाता उद्योग समुहाने यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. रूपामाता उद्योग समुहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, संचालक राजाभाऊ वैद्य, तलाठी गोकुळ शिंदे, अॅड. अजित गुंड, मिलींद खांडेकर, सरपंच येडबा शितोळे, सोमेवश्वर शिंदे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राठोड यांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना अन्नाचे पॉकीटे रविवारी देण्यात आले. यासाठी गणेश खराडे, हर्षल मोहिते, गुरूदत्त लोंढे, संजय भिसे आदींनी पुढाकार घेतला. 
 

मार्केटिंगच्या प्रशिक्षणासाठी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या पाच राज्यांतून हे सांजा परिसरात राहत होते. ते एकत्रित राहत असल्यामुळे सध्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांची बावी, शिंगोली येथील आश्रमशाळांमध्ये सध्या निवासाची सोय करण्यात आली आहे. 
- गणेश माळी, तहसीलदार