तेलंगणाचे सर्वच मजूर कुटुंबीय गेले निघून

अविनाश काळे
Tuesday, 14 April 2020

लॉकडाऊन वाढल्याच्या वृत्तानंतर लोकांची मानसिकता बदलली अन्‌ प्रशासनाची विनंती अमान्य करीत मजुरांचे कुटुंबीय गावाकडे पायी निघून गेले.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे प्रवासात अडकून पडलेल्या तेलंगणाच्या ४६५ मजूर कुटुंबाचा मुक्काम अठरा दिवसांनंतरअखेर मंगळवारी (ता. १४) उठला. प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली होती. शिवाय आरोग्याची नियमित तपासणी, विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तीकडून मदत केली जात होती; मात्र मंगळवारी लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर लोकांची मानसिकता बदलली आणि प्रशासनाची विनंती अमान्य करीत मजुरांचे कुटुंबीय गावाकडे पायी निघून गेले.

तेलंगणाचे मजूर मुंबईहून परतताना लॉकडाऊनमुळे पंधरा दिवसांपासून रस्त्यातच अडकले. पहिल्यांदा त्यांची राहण्याची मानसिकता नव्हती. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी जाण्यासाठी कोणतेही मार्ग नाहीत, असे सांगून त्यांची समजूत काढली. तसेच औद्योगिक वसाहतीत ४६५ जणांची राहण्यासह जेवणाची सोय केली.

हेही वाचा -  औरंगाबादेत सतरा वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह, संख्या पंचवीसवर 

गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासनाने तेथे तपासणीसाठी आरोग्य कर्मचारी, सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी नेमले आहेत; मात्र लॉकडाऊनचा कार्यकाळ अनिश्चित असल्याने मजुरांच्या कुटुंबांची तेथे राहण्याची मानसिकता दिसत नाही. काही जण मागील बाजूने पायी निघून गेल्याची बाब रविवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली.

सोमवारी (ता.१३) दुपारी काही लोक निघून गेले होते. त्यातील सहा ते सात जणांना पोलिसांनी परत आणले होते; मात्र लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढल्याने दुपारी साडेबाराच्या सुमारास गाठोडे बांधून मजुराचे कुटुंब गावाकडे जाण्यासाठी निघाले. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस व होमगार्ड यांनी त्यांना रोखले; परंतु त्यांची मानसिकता नव्हती. महिलांनी आम्हाला गावाकडे जाऊ द्या... असे सांगत प्रशासनाची विनंती अमान्य करीत शेतवाटेने मधला मार्ग काढता कर्नाटकात निघून गेले. तेथून ते नारायण पेठ जिल्ह्यातील गावाकडे जाणार होते. 

दोन दिवसांपासून काही लोक जात असल्याची माहिती पोलिसाकडून मेलद्वारे प्राप्त झाली. याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. प्रशासनाकडून तेलंगण राज्याशी संपर्क साधून त्यांना पाठविण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू होते. 
- संजय पवार, तहसीलदार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad All the working families of Telangana are gone