अडचणींचा भार, त्यात कोरोनाची भर

अविनाश काळे
Friday, 29 May 2020

गरीब महिलेसह तिच्या नऊ वर्षांच्या मुलाचाही अहवाल आता पॉझिटीव्ह आला आहे. मुलगाही कोरोना बाधित आल्याने हताश झालेल्या या मातेला उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी धैर्य देत आहेत.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : मुंबईहून येथे परतलेल्या आणि कोरोनाबाधित झालेल्या महिलेच्या नऊ वर्षांच्या मुलाचा अहवाल बुधवारी (ता. २७) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. विविध समस्यांनी ग्रासलेल्या या गरीब महिलेच्या अडचणींत वाढ झाली. उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी तिला धैर्य देण्‍याचा प्रयत्न करीत आहेत.

उमरगा तालुक्याच्या सीमेलगत कर्नाटकातील एक महिला पतीच्या अकाली निधनानंतर उदरनिर्वाहासाठी कांदिवली (मुंबई) येथे गेली होती. दोन मुलांसह ती तेथे नातेवाइकाकडे राहत होती. मुंबईत कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहून ती दोन मुलांसह नातेवाइकांसोबत १७ मे रोजी खासगी बसने येथील नातेवाइकाकडे आली. अस्वस्थ वाटू लागल्याने १९ मे रोजी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

२१ मे रोजी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोविड रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिच्या संपर्कातील सातपैकी पाचजणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यात तिच्या पाच वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. एका नातेवाइकाचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. तिच्या दुसऱ्या नऊ वर्षांच्या मुलाचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

बुधवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आधीच आर्थिक स्थिती बिकट असल्याने तिच्या अडचणींत वाढ झाली. येथील कोविड रुग्णालयात मायलेकावर स्वतंत्रपणे उपचार सुरू असले तरी मुलांना आईशी संपर्क साधता येत नाही. मायलेकावर अशी वेळ आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही दुःख होत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी या दोघांवर उपचारांसह मानसिक धैर्य देण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, अन्य कर्मचारी प्रयत्न करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The burden of difficulties, child's report is now positive