दिलासादायक बातमी...उमरग्यातील २९ जणांचा अहवाल निगेटिव्ह

अविनाश काळे
रविवार, 29 मार्च 2020

उपजिल्हा रुग्णालयात २० ते २६ मार्च या दरम्यानच्या काळात २९ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याच्या आईसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले होते.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उपजिल्हा रुग्णालयात परजिल्ह्यांतून येणाऱ्यांची संख्या लॉकडाऊनमुळे आता कमी होत आहे. उमरगा तालुक्यात आत्तापर्यंत २९ जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले असून, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान उमरगेकरांसाठी ही बातमी आनंदाची असली तरी ती क्षणिक समजावी लागेल. अजून बाहेरगावाहुन आलेले काही शिक्काधारी नागरिक बाहेर वावरताना दिसत आहे. कदाचित कालांतराने त्यांची प्रकृती अचानक बिघडली तर संपर्कात येणारे लोकही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे घरातच राहणे हिताचे ठरणारे आहे. 
उपजिल्हा रुग्णालयात २० ते २६ मार्च या दरम्यानच्या काळात २९ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याच्या आईसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

दोन दिवसांपासून रुग्णालयात एकही संशयित दाखल झालेला नाही. शिवाय एकाचाही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले नाही. दरम्यान अनेकांना स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा होती. ते अहवाल निगेटिव्ह आले आहेत, याचा अर्थ शहर व तालुका संसर्गमुक्त झाला असे नव्हे. अजूनही ग्रामीण भागातील काही गावात आणि शहरातही लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले व त्यांचे कर्मचारी यंत्रणा काम करीत आहेत. सर्वांनी संचारबंदीचे पालन केले तरच कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही. 

आत्तापर्यंत स्वॅब नमुने घेतलेल्या २९ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जे व्यक्ती परजिल्ह्यातून आल्या आहेत, त्यांची तपासणी करण्यात आली आहे. ऐनवेळी त्रास जाणवला तर त्यांचे स्वॅब घेतले जातील. लोकांनी अफवावर विश्वास न ठेवता स्वतःच्या काळजीकडे लक्ष द्यावे. 
- डॉ. पंडित पुरी, वैद्यकीय अधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad corona report negative