अकरा वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटीव्ह

जावेद इनामदार
Wednesday, 27 May 2020

केसरजवळगा गावात आत्तापर्यंत परजिल्ह्यातून सुमारे ६०० नागरिक आले आहेत. यात ५० जणांना होम क्वारंटाईन, तर १८ नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : सात दिवसांपूर्वी मुंबई येथून मावशी, आजी व भावासोबत आलेल्या अकरा वर्षीय मुलाचा अहवाल बुधवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता पॉझिटीव्ह आला आहे. बाधीत मुलाच्या मावशीचा अहवाल रविवारी (ता. २४) कोरोना पॉझिटीव्ह आला असून, त्यांच्यावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नवी मुंबई येथील तुर्भे नाक्यावरुन २० मे रोजी हा अकरा वर्षीय मुलगा आजी, मावशी व मोठ्या भावासह केसरजवळगा (ता. उमरगा) येथे आला होता. त्याच्या मावशीचा अहवाल रविवारी (ता. २४) कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान  

महिलेची आई आणि तिच्या बहिणीच्या दोन मुलांचे स्वॕब नमुने सोमवारी (ता. २५) मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयातून तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय मुलाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. तर त्याची आजी आणि मोठ्या भावाचा अहवाल प्रलंबित आहे. गुरुवारी (ता. १८) त्यांचे स्वॕब पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. कोरोना बाधित मुलाला पुढील उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पेठकर यांनी दिली. केसरजवळगा गावातील चारपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

केसरजवळगा गावात आत्तापर्यंत परजिल्ह्यातून सुमारे ६०० नागरिक आले आहेत. यात ५० जणांना होम क्वारंटाईन, तर १८ नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. गावातील शाळेत क्वारंटाईन नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील या अकरा वर्षीय मुलासह पाचजण बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर उपचार सुरू असलेल्या दोन रुग्णांचे दुसरे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. 
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दररोज किमान पाच ते आठ रुग्ण बाधित असल्याचे अहवाल प्राप्त होत आहेत. प्रलंबित अकरापैकी सात जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या उपचार घेणाऱ्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित चारपैकी दोघांचे अहवाल प्रलंबित, तर दोघांचे अनिर्णीत आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तुळजापूर तालुक्यातील तीन, लोहारा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. हे सर्व मुंबई, पुण्याहून आलेले अथवा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. लोहारा तालुक्यातील जेवळी येथील दोघे पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी दुसऱ्यांदा पाठविण्यात आले होते.

दोघांचेही दुसरे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील तिघे पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण मुंबईवरून आलेले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता येथील रुग्णाच्या संपर्कात आलेला एक, तसेच उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील अकरावर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर या मुलाची मावशी यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आहे. हे सर्वजण मुंबईवरून आलेले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Eleven-year-old boy Corona positive