20 गुंठ्यांवरील मिरची लागवडीतून मिळवले सव्वादोन लाख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

दावलमलिकवाडीच्या तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने केली लागवड 

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्‍यातील दावलमलिकवाडी येथील तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड करून 20 गुंठ्याच्या क्षेत्रात सव्वादोन लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. हिरव्या मिरचीची तोड अजूनही सुरू असून, आता पिकलेल्या मिरचीची मागणी वाढल्याने त्याची तोड केली जात आहे.

ठिबक सिंचनाचा वापर
गणेश कवठे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. पुणे येथे एका कंपनीत ते नोकरीला होते; मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही, त्यांनी गावाकडे परतून आधुनिक शेती पद्धतीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. शेतात भाजीपाल्याची शेती करण्याचा अनेकांचा निर्णय बऱ्याच वेळा अंगलट येतो; मात्र त्या शेतीला आधुनिकतेची जोड देऊन दर्जेदार माल घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर कमी क्षेत्रातही चांगला फायदा मिळतो, हे श्री. कवठे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी मिरची व दोडका या भाजी पिकाची निवड केली. गतवर्षी घेतलेल्या काकडीच्या 20 गुंठे क्षेत्रातील वाफ्यावर चार बाय तीन फुटांवर त्यांनी दोन हजार शंभर रोपांची लागवड केली.  पाणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. पाण्याबरोबर विद्राव्य खते देण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करण्यात आला. मल्चिंग पेपरचा वापर केल्याने पाणी कमी लागले.

पहिली तोड झाल्यानंतर साधारणतः 27 किलो वजनाचे 110 बॅग उत्पन्न निघाले. प्रतिकिलोस 30 रुपयांप्रमाणे 64 हजार 800 रुपये एवढी रक्कम मिळाली. दुसऱ्या तोडीत शंभर किलो बॅग निघाले. 15 रुपये किलोप्रमाणे 40 हजारांचे उत्पन्न मिळाले. तिसऱ्या तोडणीत 110 बॅगेच्या उत्पन्नातून 44 हजार 500 रुपये मिळाले. चौथी तोडणीत 70 बॅगेतून उत्पादन 28 हजार रुपये मिळाले. पाचवी तोडणीतून मिळालेल्या 50 बॅगेच्या मिरचीला प्रतिकिलो 35 रुपयांचा दर मिळाल्याने 47 हजार रुपये मिळाले. शुक्रवारी (ता.22) झालेल्या सहाव्या तोडीतून 30 बॅगेच्या माध्यमातून जवळपास 24 हजार रुपये मिळाले. आतापर्यंत एकूण दोन लाख 25 हजारांचे उत्पन्न मिळाले. मिरचीला योग्य भाव मिळण्यासाठी हैदराबाद, सोलापूर, पुणे या ठिकाणची बाजारपेठ महत्त्वाची असते. दरम्यान, मिरचीच्या योग्य व्यवस्थापनासाठी मंडळ कृषी अधिकारी श्‍याम खंडागळे, कृषी सहायक नितीन चेंडकाळे यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे श्री. कवठे यांनी सांगितले. 

बदलत्या वातावरणाला जुळवून घेण्यासाठी शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देणे आवश्‍यक झाले आहे. भाजीपाल्याची शेती नाजूक असते, त्याच्या जोपासण्यासाठी काळजी घ्यावे लागते. मिरचीचे उत्पन्न चांगले मिळाले आहे, आता पिकलेल्या मिरचीला मागणी होत आहे. आणखी यातून उत्पन्न मिळणार आहे. आता नव्याने 20 गुंठ्यात मिरची व काकडीची लागवड करण्याचे नियोजन सुरू आहे. 
- गणेश कवठे, शेतकरी, दावलमलिकवाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad-farmer earned more than two lakh from chilly