esakal | तेलंगणाच्या पाचशे मजुरांचा मुक्काम वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा : तेलंगणाच्या मजुरांसाठी एमआयडीसीमध्ये करण्यात आलेली निवासाची सोय.

तेलंगणा सरकार घेईना निर्णय; उमरगा प्रशासनाने एमआयडीसीमध्ये राहण्याची, भोजनाची सोय केली.

तेलंगणाच्या पाचशे मजुरांचा मुक्काम वाढला

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : मुंबई येथे कामाला गेलेल्या तेलंगणा राज्यातील मजुरांच्या कुटुंबातील ४९१ नागरिक गावाकडे परतत असताना उमरगा तालुक्यातील कसगी गावाजवळील सीमेवर कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी (ता. २७) रात्री त्यांना रोखले होते.

येथील प्रशासनाने कर्नाटक व तेलंगणा प्रशासनाशी शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी (ता. २८) सांयकाळपर्यंत संपर्क साधला; मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊनही तेलंगणा सरकार जबाबदारी घेत नसल्याने लहान मुलांसह महिला व पुरुष रस्त्यावरून निघायला तयार नव्हते. दरम्यान दुपारी आरोग्य पथकाने सर्व लोकांची तपासणी केली. त्यांनतर प्रशासनाने रात्री उमरगा येथील एमआयडीसीमध्ये एका गोदामासह परिसरामध्ये राहण्याची, भोजनाची केली सोय केली. रविवारीही (ता. २९) त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली, मात्र त्यांची राहण्याची मानसिकता दिसत नाही, आम्हाला येथून पाठवा अन्यथा काही तरी करून घेऊ, असे बोलणे सुरु झाल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

हेही वाचा :  कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी

उदरनिर्वाहासाठी तेलंगणा राज्यातील मजूर मुंबईत गेले होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने हे मजूर कुटुंबीयासह टेम्पोतून गावाकडे परतत होते. शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्रातून त्यांचा प्रवास पूर्ण झाला आणि ते जकेकूर-चौस्तामार्गे कलबुर्गी मार्गाने निघाले. मात्र कसगी गावाजवळील सीमेवर त्यांना कर्नाटक पोलिसांनी अडविले. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, तहसीलदार संजय पवार यांच्यासह पोलिस कर्मचारी सीमेवर पोचले.

कर्नाटकातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी पहाटे तीनपर्यंत चर्चा केली तरीही मार्ग निघाला नाही. शनिवारी सकाळी अकरा वाजता उमरगा तहसील कार्यालयात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कर्नाटक व तेलगंणा राज्याच्या सचिव पदांपर्यंतच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, मात्र उशीरापर्यंत तेलंगणा सरकारचा निर्णय होऊ शकला नाही. या दरम्यानच्या काळात कसगी ग्रामपंचायतीने भोजनाची व्यवस्था केली. महसूल व पोलिस यंत्रणेसह भाजपचे जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, किरण गायकवाड आदींनी यासाठी सहकार्य केले. दरम्यान महसूल व पोलिस प्रशासनात समन्वय नसल्याने दोन्ही विभागांत अधूनमधून खटके उडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

आरोग्य विभागाने केली तपासणी 
सास्तूर (ता. लोहारा) येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य पथकातील प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, डॉक्टर्स व कर्मचारी तसेच उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. विनोद जाधव, डॉ. वाघमारे व कर्मचाऱ्यांनी ४९१ लहान-मोठ्या लोकांची तपासणी केली. काही मोजक्या लोकांना सर्दीचा त्रास होता. त्यांना औषधे देण्यात आली. 

एमआयडीसीमध्ये केली सोय 
अडकलेल्या लोकांना गावाकडे पाठविण्यासाठी मार्ग निघत नसल्याने येथील प्रशासनाचीही चांगलीच गोची झाली आहे. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक अमोल मालुसूरे यांनी या लोकांना रस्त्यावरून उमरग्याकडे येण्याची विनंती केली, परंतु त्या लोकांमध्ये प्रशासनाबद्दल भिती असल्याने ते येण्यास नकार देत होते.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असा दिलासा दिल्यानंतर त्यांना वाहनातून रात्री साडेआठ वाजता एमआयडीसीमधील विजय जाधव यांच्या प्लॅन्टच्या जागेत आणण्यात आले. अब्दुल सत्तार राजेसाब कारचे, श्री. जाधव यांनी सर्वांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली. त्यांना जकेकूरचे उपसरपंच अनिल बिराजदार, संतोष वकारे, बालाजी मदे, सलीम विजापूरे यांचे सहकार्य मिळाले. 

गेल्या दोन दिवसांपासून अडकलेल्या लोकांना गावाकडे पाठविण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत, मात्र तेलंगणा सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. माणूस म्हणून त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. 
- माधवराव गुंडिले, पोलिस निरीक्षक 
वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करूनही तेलंगणा सरकार अडकलेल्या लोकांना परत घेण्यासाठी काहीही हालचाली करीत नाही. त्यामुळे लोकांना पाठवता येणार नाही. आता महाराष्ट्र सरकारच्या सूचनेनुसार लोकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. अडकलेल्या लोकांनी पाठविण्याचा निर्णय होईपर्यंत सकारात्मक मानसिकता ठेवावी. 
- संजय पवार, तहसीलदार 
संकटसमयी अडचणीत आलेल्या लोकांना सामाजिक भावनेतून मदत करण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकांच्या सेवेत काम करण्याचा आनंद मिळतो, परंतु काही लोक स्थिर नाहीत. सर्वांनी अडचणीच्या काळात सेवा देण्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यांना मदत केली पाहिजे. प्रशासनाकडून सहकार्य अपेक्षित आहे. 
- विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते

loading image