लाभार्थींना मोफत तांदूळ वाटप सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा पुरवठा विभागाने घेतली आहे.

कळंब (जि. उस्मानाबाद) : अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थींना तालुक्यातील १४० रास्त भाव दुकानदारांमार्फत एप्रिल महिन्यातील धान्य वितरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदूळ तालुक्यातील ६२ रास्त भाव दुकानांत पोचला असून, त्याचेही वाटप युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, उर्वरित दुकानदारांनाही मोफत तांदूळ लवकरच पुरवठा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही नागरिक उपाशी राहू नये. यासाठी पुरवठा विभागाकडून शासनाच्या आदेशाचे पालन करीत पात्र कार्डधारकापर्यंत तत्काळ धान्य पोचविण्याचे काम वेगात सुरू आहे. 
प्रत्येक महिन्याला दिले जाणारे धान्य पात्र लाभार्थीपर्यंत पोचविण्याचे काम रेशन दुकानदारांकडून नियमित केले जात आहे.

बाहेर वास्तव्यास असणाऱ्या व्यक्ती कोरोनाच्या धास्तीने गावाकडे परतल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यसंख्या वाढली आहे; मात्र वाढीव सदस्यांचे आधारकार्ड पॉस मशीनला जुळत नसल्याने धान्य कोठून देणार, असा प्रश्न दुकांदारापुढे आहे. त्यामुळे धान्य न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तालुक्यातील १४० दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थींना धान्य वितरण करण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

तालुक्यातील ६२ दुकानांत मोफत तांदूळ पोचला असून, वाटप तत्काळ सुरू झाले आहे. तालुक्यात १४० रास्त भाव दुकानदार असून, अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तालुक्यासाठी सहा हजार ७५० क्विंटल तांदळाचे नियतन मंजूर आहे. शासकीय गोदामात जसजसे धान्य उपलब्ध होईल, तसा पुरवठा रास्त भाव दुकानदारांकडे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रतिसदस्य पाच किलोप्रमाणे मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे.
दक्षता समितीसमक्ष मोफत तांदूळ वाटप 
दरम्यान, शासनासकडून मोफत तांदूळ वाटप करताना कुणाची तक्रार येणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाव दक्षता समितीचे अध्यक्ष किंवा सदस्यांच्या समक्ष मोफत धान्य वाटप करावे, तसेच धान्य वाटपाचा अहवाल कार्डधारकाच्या १२ अंकी क्रमांकासह यादी व दक्षता प्रमुखांच्या सही-शिक्क्यासह पाठविण्याच्या सूचना रास्त भाव दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Free rice distribution to beneficiaries started