लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार किराणा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

भूम नगरपालिकेकडून जनजागृती करीत किराणा घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शनिवारच्या जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला. 

भूम (जि. उस्मानाबाद) : जनता कर्फ्यूला शहरात शनिवारी (ता. चार) नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शनिवारी व रविवारी (ता. पाच) असे दोन दिवस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये घरपोच किराणा मिळण्याची सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहर परिसरात जनता कर्फ्यूला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असला, तरीही काही वाहनांची ये-जा होती. यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे; मात्र जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शासनाने आता खबरदारी घेतली आहे.

हेही वाचा - राजीनामा देऊन परतणारा डॉक्टर अपघातात जखमी

त्यातच येथील पोलिस ठाण्याच्या वतीने भूम-नगर रोड, भूम-कुंथलगिरी रोड, भूम-उस्मानाबाद रोड, भूम-परंडा रस्त्यावर शहराबाहेर बॅरिकेड्‍स लावून शहरात विनाकारण वाहने घेऊन येणाऱ्यांना प्रतिबंध केला. जनता कर्फ्यूला कर्मचारी अपुरे पडत असल्याने भूम पोलिस ठाणे व नगरपालिकेच्या वतीने शंभर स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. प्रत्येक पॉइंटवर दोन कर्मचारी व चार स्वयंसेवक ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा - हे तीन अ‍ॅप ठरले महत्त्वाचा दुवा - बीडमध्ये बाहेरून आलेल्या ७० हजार जणांची नोंद

चौकाचौकांत चार स्वयंसेवक ठेवून नागरिक घराबाहेर निघणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. शहरात ४० किराणा दुकानदार व भाजीपाल्यासह औषधी दुकानदारांची मोबाईल यादी शहरातील चौकाचौकांत लावली आहेत. ज्या नागरिकांना किराणा, दूध, औषधी, भाजीपाला पाहिजे त्यांनी या स्वयंसेवकांकडून मागवून घ्यावे, असे आवाहनही नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Groceries will be available in Lockdown at home