स्वतःहून माहिती द्या, अन्यथा गुन्हे दाखल होणार

तानाजी जाधवर
सोमवार, 6 एप्रिल 2020

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी माहिती लपवल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी दिला आहे.

उस्मानाबाद : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांची माहिती हेल्पलाईन कक्षाला द्यावी, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी सोमवारी (ता. सहा) सोशल माध्यमावर जाहीर आवाहन केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे. देशाच्या अनेक भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमानंतर जिल्ह्यात दोन रुग्ण आढळून आले होते. याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून याबाबत सोमवारी जाहीर आवाहन केले आहे.

हेही वाचा- धक्कादायक घाटी रुग्णालयात ब्रदरला कोरोनाची लागण

त्यांनी म्हटले आहे की, निजामुद्दीन मर्कज दिल्ली, पानिपत (हरियाना), राजस्थान, उत्तरप्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमातच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील काही नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी स्वतः होऊन हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती कळवावी. प्रशासनाकडून आपणास योग्य ते सहकार्य करण्यात येईल. कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हाच प्रभावी उपाय आहे. शिवाय कोरोना विषाणूचा संसर्गास प्रतिबंध करणेच गरजेचे आहे.

मोठी बातमी -  महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवायचा की नाही? राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत, म्हणालेत...

आपले कुटुंब, समाज, गाव कोरोनाच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करावे. भविष्यात कोरोनाबाधित आढळून आल्यास आणि जाणीवपूर्वक माहिती लपवून ठेवल्यास गुन्हा नोंद करून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अशा नागरिकांनी अतिरीक्त पोलिस अधीक्षक संदीप पालवे (मो. ९५४५५३१२३४), उपजिल्हाधिकारी (रोहियो) एम. एस. कांबळे (मो. ९९६०४२५८७०), जिल्हाधिकारी कार्यालय (रोहियो) ०२४७२- २२२२७९ या हेल्पलाईन क्रमांकावर सपर्क करून माहिती द्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी केले आहे. 

व्हॉट्सअॅपवर संदेश टाकताय, दक्षता घ्या 
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनला आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे; अन्यथा एखाद्याने समाजविघातक संदेश टाकल्यास त्या ग्रुपच्या अॅडमिनवर गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असा इशारा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिला आहे.

रविवारी (ता. पाच) प्रसिद्ध केलेल्या पत्रात दिल्ली येथील घटनेनंतर व्हॉटस्‌अॅप ग्रुप व विविध प्रकारचे सांप्रदायिक भडकाऊ संदेश हिंदू-मुस्लिम ग्रुपमध्ये प्रसारित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सांप्रदायिक घटना घडण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. पोलिस विभागाच्या वतीने प्राप्त होणाऱ्या संदेशांवर गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे.

या आदेशामध्ये सात गोष्टींबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ग्रुपवर फक्त अॅडमिन हेच संदेश पाठवू शकतील, ग्रुपवरील इतर कोणताही सदस्य संदेश पाठवू शकणार नाही, ग्रुपवर कोणीही धर्म, धर्मग्रंथ, धार्मिक स्थळाबाबत संदेश प्रसारित केल्यास, तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकेल, असे संदेश प्रसारित केल्यास अॅडमिन गुन्ह्यास पात्र ठरणार आहे. हे आदेश पूर्णपणे प्रशासकीय कामकाजाकरिता उपयोगात आणल्या जाणाऱ्या ग्रुपला लागू राहणार नाहीत, अशीही माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Inform yourself, otherwise the crime will be registered