तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन भाजप शेतकऱ्यांसाठी उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

पक्षाच्या वतीने तुळजाभवानी मातेसमोर महाआरती करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली

उस्मानाबाद: खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

पक्षाच्या वतीने तुळजाभवानी मातेसमोर महाआरती करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरून देखील या पिकांच्या नुकसानीपोटी पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम देताना जाचक अटी लादल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अनेक अडचणी आल्या.

हिंगोली तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यात १९ गाव कारभाऱ्यांची निवड 

वास्तविक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या कृषी विभागाने पाठवल्यावरून शेतकऱ्यांना मदतही दिली. हेच कृषी विभागाचे पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा भरपाई द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले की, पीक विम्याचे ४५० कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा झालेले असताना देखील कंपनीने फक्त ७० ते ८० कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले आहेत. उर्वरित रक्कम घशात घातली आहे. शासनाने अशा नफेखोरीकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा. विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर न भेटल्यास पक्षाच्या वतीने शेतकरी रस्त्यावर उतरतील. साखळी पद्धतीने २२ फेब्रुवारीपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.

'गुणवत्तापूर्ण कामे करा, जिल्ह्याअंतर्गत विकासकामांवर भर द्यावा'

सुधीर पाटील, खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, राजसिंह राजेंनिंबाळकर, अजित पिंगळे, राजाभाऊ पाटील, संतोष बोबडे, इंद्रजित देवकते, दिलीप पाटील, दत्ता सोनटक्के, रामदास कोळगे, संजय पाटील व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad latest news With the blessings of Tulja Bhavani BJP took to the streets for the farmers