esakal | दिलासादायक! लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

बोलून बातमी शोधा

lohara

दिलासादायक! लोहारातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

sakal_logo
By
निळकंठ कांबळे

लोहारा (जि. उस्मानाबाद): कोरोनाबाधित रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे नागरिकांत कमालीची भीती निर्माण झाली असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र तालुक्यात आहे. आतापर्यंत १ हजार ४९५ पैकी १ हजार १३९ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला केवळ ३२२ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गतवर्षापासून कोरोना संसर्गाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही काळ गायब झालेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा उसळी घेतली आहे. मागील महिन्याभरापासून तालुक्यात कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत आहे. या संसर्गाचे समूळ उच्चाटन करणारे प्रभावी औषधांची अद्याप निर्मिती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

हेही वाचा: इथं मरणालाही जावं लागलं माघारी! २४ स्कोर असतानाही रुग्णाची कोरोनावर यशस्वी मात

कोरोनाबाधित रुग्णांवर येथे योग्यरित्या उपचार केला जात आहे. रूग्ण गंभीर असेल तर त्याला तुळजापूर अथवा उस्मानाबाद येथील शासकीय कोविड रूग्णालयात रेफर करण्यात येते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाने कोविड टेस्ट वाढविल्या असल्यामुळे संख्या वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र तालुक्यात आहे.

मनुष्यबळ कमी असतानाही तालुका आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या या प्रयत्नालाही मोठे यश येत आहे. कोरोना लसीकरण करण्यावर आरोग्य विभागाने अधिक भर दिला आहे. शहरातील ग्रामीण रूग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून कोविड लस देण्यात येत आहे. परंतु कोविड लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

हेही वाचा: ‘तो’ फक्त खातो पोलिसांच्या हातची भाकरी!

शनिवारपर्यंत (ता.२४) तालुक्यात १ हजार ४९५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात शहरात ३२७ तर ग्रामीण भागातील १ हजार १६८ रूग्णांचा समावेश आहे. १ हजार ४९५ पैकी १ हजार १३९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात शहरातील २७५ तर ग्रामीण भागातील ८६४ बरे झालेल्यांचा समावेश आहे. सध्या केवळ ३२२ रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ३४ जनांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्याचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.१८ टक्के तर मृत्यू दर २.२७ आहे.

कोरोना संसर्गाला घाबरून न जाता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. कोरोना रूग्ण बरे होतात. मात्र सर्वांनी काळजी घ्यावी, मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आजार अंगावर न काढता जवळच्या रूग्णालायत तपसणी करून औषधोपचार वेळत घेतल्यास कोरोनावर मात करता येते.

डॉ. अशोक कटारे (तालुका आरोग्य अधिकारी, लोहारा)