esakal | उस्मानाबादेत जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद, ठिकठिकाणी रस्ते निर्मनुष्य
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Janta Curfew News

विशेष म्हणजे रविवारी शहरात बाजार भरतो. मात्र जनता कर्फ्यूमुळे भाजीपाला बाजार रद्द करण्यात आला होता. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच अनेक रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.

उस्मानाबादेत जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद, ठिकठिकाणी रस्ते निर्मनुष्य

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद :  यंदाच्या वर्षातील पहिल्या जनता कर्फ्यूला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शहरात ठिकठिकाणी रस्ते निर्मनुष्य होते. एटी बस वाहतुकी संथगतीने सुरू होती. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वतः शहरात फिरुन जनता कर्फ्यूची परिस्थिती जाणून घेतली. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच रविवारी (ता.१४) जिल्ह्याला जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. सातत्याने वाढणारी कोरोनाची रुग्णाची संख्या, यामुळे अखेर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश श्री.देवगावकर यांनी दिले होते.

विशेष म्हणजे रविवारी शहरात बाजार भरतो. मात्र जनता कर्फ्यूमुळे भाजीपाला बाजार रद्द करण्यात आला होता. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच अनेक रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. शहरातील बार्शी नाका, नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. मात्र जनता कर्फ्यूमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होती.  या ठिकाणी ही रस्ते निर्मनुष्य दिसत होते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, तहसीलदार गणेश माळी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदींनी शहरात ठिकठिकाणी जाऊन जनता कर्फ्यूची परिस्थिती जाणून घेतली. काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर दिसून येत होते. पोलिस प्रशासनाला सांगून त्यांची फिरणे बंद करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.


बसस्थानकात तुरळक वाहतूक
बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शहरातील बस स्थानकावर दिसत होत्या. शिवाय लांब पल्ल्याच्या गाड्या ही उस्मानाबाद आगारातून सुटल्या होत्या. दरम्यान सकाळच्या सत्रात बार्शी, सोलापूर, लातूर, कळंब आदी ठिकाणी बस सेवा सुरू होती. मात्र प्रवासी वर्गातून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दुपारनंतर या ठिकाणची बस वाहतुकीची बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.


संपादन - गणेश पिटेकर