
उस्मानाबाद : वलांडी परिसरात 'बिबट्याची' दहशत
देवणी : वलांडी भागात बिबट्याची दहशत कायम असून, शुक्रवारी हरणाची शिकार अन् मध्यरात्री नागरीकांना दिसण्याच्या अफवेमुळे भीतीच्या वातावरणात वाढ झाली आहे. शेतशिवारात नागरिक दिसेनासे झाले आहेत.
सध्या तालुक्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्याने उन्हाळी हंगामातील सोयाबीन, भाजीपालावर्गीय पिके, टरबूज, खरबूज यांची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नागरिकांचा मोठा वावर आहे. मात्र, गेल्या चार दिवसांत बिबट्याचा मुक्त वावर परिसरात असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी दुपारी कोरेवाडी (ता. देवणी) प्रगतिशील शेतकरी दत्ता माधवराव अर्जुने या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.
त्यानंतर दोन दिवस अज्ञातवासात असलेला बिबट्याने शुक्रवारी पहाटे बोंबळी (खुर्द) येथील पोलिस पाटील मारोती भोसले यांच्या शेतीत हरणाची शिकार केली होती. त्याच दिवशी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास अनंतवाडी (ता. देवणी) येथील शेतकरी विष्णुदास भोसले शेतीकडे जात असताना शिवरस्ता ओलांडून बिबट्या उसाच्या शेतीत जात असताना त्यांना दिसला. त्यांनी तत्काळ माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांना शनिवारी वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा गिते यांना संबंधित घटनेची माहिती दिली.
परिसरात एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला, एका हरणाची शिकार व पुन्हा एका शेतकऱ्याला बिबट्या दिसला. मात्र, वनविभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असून, हल्यात जीवितहानी होण्याची प्रतीक्षा वनविभाग करीत आहे का? असा प्रश्न पडतो. संबंधित कर्मचारी वाहनातून बिबट्याचा शोध घेत आहेत. अद्याप एका ठिकाणीही पिंजरा लावण्यात आला नाही.
- शशिकांत शिंदे, शेतकरी, हेंळब