शहरांची वाटचाल क्लीन सिटीच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसह एक नगरपंचायत पाणंदमुक्‍त

उस्मानाबाद - जिल्ह्यातील शहरांची वाटचाल क्लीन सिटीच्या दिशेने सुरु आहे. दोन ऑक्‍टोबरपर्यंत संपूर्ण जिल्हा पाणंदमुक्‍त केला जाणार आहे. आठ नगरपालिका व एक नगरपंचायत पाणंदमुक्‍त झाली असून, केवळ लोहारा नगरपंचायतीची राज्यस्तरीय तपासणी अद्याप झालेली नाही. आगामी काही दिवसांत संपूर्ण शहरी भाग स्वच्छ व सुंदर होणार आहे. 

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसह एक नगरपंचायत पाणंदमुक्‍त

उस्मानाबाद - जिल्ह्यातील शहरांची वाटचाल क्लीन सिटीच्या दिशेने सुरु आहे. दोन ऑक्‍टोबरपर्यंत संपूर्ण जिल्हा पाणंदमुक्‍त केला जाणार आहे. आठ नगरपालिका व एक नगरपंचायत पाणंदमुक्‍त झाली असून, केवळ लोहारा नगरपंचायतीची राज्यस्तरीय तपासणी अद्याप झालेली नाही. आगामी काही दिवसांत संपूर्ण शहरी भाग स्वच्छ व सुंदर होणार आहे. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहाची शंभर टक्के कामे करण्यावर भर दिला जात आहे. उस्मानाबाद नगरपालिका यापूर्वीच विभागात प्रथम आली आहे. यातून पालिकेला दोन कोटी रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. तर उर्वरित तीन पालिकांनाही प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मिळालेल्या बक्षिसातून स्वच्छता अभियानाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. तसेच उद्याने फुलविण्यासाठी प्रयत्न करण्याची कामे यातून केली जात आहेत. जिल्ह्यातील उस्मानाबाद, भूम, मुरुम व उमरगा पालिकांची राष्ट्रीय स्तरावरील तपासणी पूर्ण झाली आहे. क्वालिटी कंट्रोलची टीम या चारही शहरात येऊन तपासणी पूर्ण करून गेली आहे. उर्वरित चार पालिकांची राष्ट्रीय स्तरावरील तपासणी प्रस्तावित आहे. यात तुळजापूर, कळंब, नळदुर्ग व परंडा नगरपालिकेचा तर वाशी नगरपंचायतीचा यामध्ये समावेश आहे.

येत्या १५ दिवसांत राष्ट्रीय स्तरावरील तपासणी पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान लोहारा नगरपंचायतीची तपासणी मात्र अद्याप पूर्ण झालेली नाही. राज्यस्तरीय तपासणी झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील तपासणी नगरपंचायतीला पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजेच आठ नगरपालिका व एक नगरपंचायत संपूर्ण स्वच्छ झाली असून या ठिकाणच्या सर्व नागरिकांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच सध्या सर्व नागरिक स्वच्छतागृहांचा वापर करीत आहेत. 
 

सहा महिन्याला तपासणी
एकदा राष्ट्रीय स्तरावरील तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पालिकेला स्वच्छतेचा मंत्र जपावा लागणार आहे. प्रत्येक सहा महिन्याला पालिकेच्या स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या कामांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क राहावे लागेल.

जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सर्वच नगरपालिका तसेच नगरपंचायतींनी स्वच्छतेचा वसा घेतला आहे. यातून जिल्ह्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. सध्या मिळालेले यश दर सहा महिन्याला टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर असणार आहे.
- बाबासाहेब मनोहरे, प्रशासन अधिकारी, उस्मानाबाद.

Web Title: osmanabad marathwada news walking towards the city clean city