
उस्मानाबाद : मुरूम येथील घटनेप्रकरणी पोलिस अधिकारी निलंबित
उमरगा : तालुक्यातील मुरुम येथे सात मे रोजी झालेल्या दोन गटातील हाणामारीप्रकरणी मुरुम पोलिस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक नवनाथ माळी यांच्यासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुरुम शहरात ७ मे रोजी महापुरुषाच्या मिरवणुकी दरम्यान गोंधळ झाला होता. मिरवणुकीत सहभागी असलेल्या जवळपास १२ जणांवर जातीत धार्मिक तेढ निर्माण होईल, या उद्देशाने गल्लीत दगडफेक केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दंगल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मुरुम येथे भेट दिली. त्यांनी चौकशी केली असता पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच दंगल झाल्याचे निदर्शनास आले.
गटांमध्ये समन्वय न ठेवणे. उग्र कृती करणाऱ्यांना नोटीस न बजावणे आदी कारणांमुळेच दंगलसदृश्य परिस्थिती नियंत्रणात राहिली नाही. याचा ठपका सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक नवनाथ माळी यांच्यावर ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच योग्य प्रकारे बंदोबस्त न लावणे, जमावाला नियंत्रित न करणे, बंदोबस्ताकडे दुर्लक्ष करून अन्यत्र फिरणे, परिस्थितीवर कंट्रोल मिळवण्यात अपयश येणे आदी कारणांमुळे पोलिस हवालदार संदिपान अंबादास कोळी, पोलिस शिपाई सौरभ जगन्नाथ घुगे, श्रीराम सोपान सोनटक्के, अमर प्रताप जाधव या चौघांना निलंबित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाच जणांना जामीन
या प्रकरणी दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, या पैकी पाच जणांना पोलिसांनी घटनेनंतर लागलीच अटक केली होती तर इतर फरार आहेत. अटक केलेल्या पाच जणांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणी आरोपीचे वकील म्हणून ॲड. आगजी वडदरे यांनी काम पाहिले.
Web Title: Osmanabad Murum Police Officer Suspended In Fighting Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..