
उस्मानाबाद : वैद्यकीय महाविद्यालयाची पंधरा दिवसांत तपासणी
उस्मानाबाद : जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एन.एम.सी)चे पथकाला येत्या पंधरा दिवसामध्ये आमंत्रित केले जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यांच्या मंजुरीनंतरच खऱ्या अर्थाने महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता मिळणार आहे.
आता पथकाची प्रतिक्षा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन करताना दिसत आहे. त्यादृष्टीने युध्दपातळीवर तयारी देखील सुरू असून अनेक गोष्टी पूर्णत्वास आल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय साकारत असून यंदापासून तिथे प्रवेश प्रक्रिया होण्याच्यादृष्टीने शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन ते अडीच महिन्यांपासून या प्रक्रियेला अधिक गती आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयात सर्व यंत्रणा, इमारती, मोकळ्या जागा आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने तिथे मोठ्या प्रमाणात काम देखील सुरू होत आहेत. अनेक इमारतीची दुरूस्ती होत असून रस्त्याची डागडुजी केली जात आहे.
काही दिवसांत येणाऱ्या एनएमसीच्या पथकाच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी हाती घेतल्या आहेत. ही प्रक्रिया अधिक गतीमान करुन पुढील पंधरा दिवसामध्ये एन.एम.सी कडे प्रस्ताव देऊन त्या पथकास पाहणीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. त्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा दिवसात हे पथक याठिकाणी पाहणीला येणे अपेक्षित आहे, साधारण एक महिन्यापर्यंत पथक पाहणीला आल्यास पुढे अडचण येणार नाही. अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया आली आहे.
पूर्णवेळ अधिष्टाता म्हणून आलेले डॉ. संजय राठोड हे रुजू झाल्यानंतर त्यानी खऱ्या अर्थाने हे शिवधनुष्य हाती घेतले आहे. यंत्रणेसह समन्वय ठेवून त्यांनी प्रशासकीय कामकाज अधिक गतीने पुढे नेले आहे. त्यांना राजकीय मंडळीकडूनही मोठे सहकार्य मिळत असून सत्ताधारी लोकप्रतिनिधी महाविद्यालय यंदा सुरू करण्यासाठी आग्रही असून त्यांनी अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले वजन वापरल्याचे दिसून आले आहे.
प्राध्यापक नियुक्तीची प्रक्रिया सुरू
त्यामुळे एनएमसीच्या पथकाची पाहणी व त्यांच्याकडून सकारात्मक अहवाल आल्यास निश्चितपणे यंदा हे महाविद्यालय सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा वर्ग एक व दोनच्या ८८ प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्याचीही प्रक्रिया सुरू झाली असून तीन व चार वर्गाची भरती ही ऑऊटसोर्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. लवकर नियुक्त्या होऊन एन.एम.सी.च्या पथकाचे समाधान होईल यासाठी समन्वयाने प्रयत्न केले जात आहेत.
Web Title: Osmanabad National Medical Commission Inspection In Fifteen Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..