esakal | पानमळ्यांतील लाखो पाने जागेवरच खराब
sakal

बोलून बातमी शोधा

कुन्हाळी (ता. उमरगा) : अरविंद बिराजदार यांच्या शेतातील पानमळ्याची स्थिती.

तालुक्यातील जवळपास पन्नास पानमळ्यांतील लाखो पाने जागेवरच खराब होत असल्याने गेल्या दहा ते बारा दिवसांत जवळपास १५ लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

पानमळ्यांतील लाखो पाने जागेवरच खराब

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे गेल्या दहा दिवसांपासून सर्व व्यवहार, व्यवसाय व वाहतूक बंद असल्याने शेतमालाच्या उठावावर मोठा परिणाम झाला. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाजीपाल्याची विक्री काही प्रमाणात होत आहे; मात्र फळपिकांवर मात्र कमालीची मर्यादा आली आहे. त्यातल्या त्यात तालुक्यातील जवळपास पन्नास पानमळ्यांतील लाखो पाने जागेवरच खराब होत असल्याने गेल्या दहा ते बारा दिवसांत जवळपास १५ लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

तालुक्यातील कुन्हाळी, तलमोड, कराळी, कदमापूर व तुरोरी शिवारात पानमळ्यांची संख्या जवळपास दोनशेच्या घरात होती. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने ती संख्या कमी झाली. त्यात पाण्याची कमतरता हे मुख्य कारण होते. गेल्या दहा ते बारा वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी पानमळे मोडीत काढले. सद्य:स्थितीत ४० ते ५० पानमळे शेतकऱ्यांनी मेहनतीने टिकवून ठेवले आहेत. कुन्हाळीच्या शिवारात सर्वाधिक पानमळे आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ऐन उन्हाळ्यात पानांचा दर्जा कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. शेतकरी तशी मेहनत घेत आहेत; मात्र एका कोरोना विषाणूने जीवितहानी होत असल्याने संपूर्ण जग हादरून टाकल्याने केंद्र व राज्य सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले आहे. गर्दी व एकमेकांच्या संपर्कातून होणारा संसर्ग जीवितहानीसाठी कारणीभूत ठरत असल्याने सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे; मात्र शेती पिकांच्या नुकसानीचे संकट शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी टाकत आहे. त्याची भरपाई कोण देणार, या विवंचनेत शेतकरी आहेत. 

लाखो पाने झडताहेत 
उन्हाळ्यात पानांची जपणूक मोठ्या मेहनतीने करावी लागते. लॉकडाऊनमुळे पानटपऱ्या बंद आहेत. स्थानिक व्यापारीही येत नाहीत. शिवाय पानांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या शेजारील लातूर शहरातील तर व्यवसाय कडेकोट बंद आहेत. गेल्या पंधरा दिवसांत एका पानमळ्यातील सरासरी दहा डाग पाने बाजारपेठेत गेली असती. एका डागेत २० हजार पाने असतात. त्याला साधारणतः दोन ते चार हजार रुपये मिळतात; परंतु वाहतूक बंद आहे.

शिवाय बाजारपेठाही बंद असल्याने मागणी होत नाही. या भागातील ४० ते ५० पानमळ्यांचे शेतकरी उठाव नसल्याने अडचणीत आले आहेत. पंधरा दिवसांच्या काळात पानमळ्याचे मालकांचे जवळपास १५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. यापुढील पंधरा दिवसांचा काळही असाच कठीण असल्याने आणखी १५ लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. दरम्यान, कुन्हाळी शिवारात कलकत्ता पानाचे पाच लाख खर्च करून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न कैलास आष्टे यांनी केला; पण आता ऐन पानाची प्रत्यक्ष मागणी असताना बाजारपेठेपर्यंत पान पोचविणे कठीण झाले आहे. 

निसर्गाचा फटका बसल्यानंतर पानमळ्याचे नुकसान यापूर्वीही शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहे. आता लॉकडाऊनमुळे पानांच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. उठाव नसला तरी वेलीला झडलेल्या आणि परिपक्व झालेल्या पानांची तोड करावीच लागते. त्यासाठी येणाऱ्या मजुरीचा खर्च वाया जातो आहे. एक एकरातील पानमळ्यातील पानांची विक्रीच थांबल्याने पंधरा दिवसांत पन्नास हजारांचे नुकसान सहन करावे लागले. आता पंधरा दिवसांतील दुसरी तोडही वायाच जाणार आहे. 
- अरविंद बिराजदार, शेतकरी, कुन्हाळी. 

पानमळ्याची शेती मोठ्या मेहनतीने पिकवावी लागते. विक्रीला आलेले पाने आता भुईला वाया घालवावे लागत आहेत. कलकत्ता पानांची पहिल्या शेतीचा प्रयोग यशस्वी होत असतानाच लॉकडाऊनमुळे विक्री ब्रेकडाऊन केल्याने पाने जागेवरच खराब होत आहेत. निब्बरलेले एक-एक पान आता काढून टाकावे लागत आहे. पंधरा दिवसांत ३० ते ४० हजारांचे नुकसान सहन करावे लागत आहे. राज्य सरकारने पानमळ्याचा फळबाग योजनेत समावेश करून नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. 
- कैलास आष्टे, शेतकरी, कुन्हाळी 
 

loading image