आतापर्यंत १६४५ शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पंचनामे

सयाजी शेळके
सोमवार, 29 जून 2020

बियाणे कंपन्यांसोबत बैठक झाली असून नवीन बियाणे अथवा त्याचा परतावा देण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

उस्मानाबाद : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या दोन हजार १७३ तक्रारी दाखल झाल्या असून, एक हजार ६४५ पंचनामे पूर्ण झाले आहेत. महाबीज कंपनीच्या सर्वाधिक तक्रारी असून, शेतकऱ्यांनी तालुकास्तरावरील समितीकडे बियाणांबाबतच्या तक्रारी द्याव्यात.

बियाणे कंपन्यांसोबत बैठक झाली असून नवीन बियाणे अथवा त्याचा परतावा देण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रामध्ये खरिपाची पेरणी केली. पावसाळ्याच्या सुरवातीस खरिपाची पेरणी उरकल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते; मात्र पेरणीनंतर चार-पाच दिवसांतच हे हास्य मावळले आहे. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच बियाणे न उगवल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार १७३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ

अशा आहेत तक्रारी 
जिल्ह्यात झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक एक हजार १२७ तक्रारी महाबीज कंपनीच्या बियाणाबाबत असून ८७८ ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ग्रीनगोल्ड ६२१ तक्रारींपैकी ४८३ पंचनामे पूर्ण झाले आहेत. वसंत ८२ पैकी ६९, वरदान ८५ पैकी ३७, कृषिधन ५८ पैकी ५१, यशोदा ३० पैकी २६ पंचनामे पूर्ण झाले आहेत. 
हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान  
तक्रारी द्या 
जिल्ह्यात आतापर्यंत ६८ टक्के सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत; मात्र जर काही शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसेल, तर त्यांनी तालुकास्तरावर तक्रारी द्याव्यात. उस्मानाबाद, कळंब तालुक्यांत सर्वाधिक तक्रारी येत असल्याने तेथे दोन ठिकाणी तक्रारी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

नुकसानभरपाई मिळणार? 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांनी बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची सोमवारी (ता. २९) बैठक घेतली आहे. यामध्ये कंपन्यांनी नवीन बियाणे देण्याचे कबूल केले आहे. अन्यथा, बियाणाची रक्कम परत शेतकऱ्यांना देण्याबाबत कंपन्यांनी सकारात्मकता दाखविली असल्याचेही श्री. मंगरूळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले आहे. 

गेल्यावर्षी राज्यात ऐन सोयाबीन काढण्याच्या वेळीच पाऊस झाला. अतिपावसाने बियाणे पाण्यात भिजले. त्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनला अंकुर फुटले होते. त्यामुळे अशा बियाणांमध्ये दोष आढळून येत आहेत. यातील बियाणे प्लॉट असलेल्या शेतकऱ्यांनी भिजलेले बियाणे महाबीजसह इतर अनेक कंपन्यांकडे दिल्याने असे प्रकार घडले असल्याची चर्चा सध्या राज्याच्या वर्तुळात सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about farmers