भाजी खरेदीसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सचा बोजवारा

दिलीप गंभिरे
सोमवार, 6 एप्रिल 2020

कळंब शहरात दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर ग्राहकांची आज बाजारात मोठी गर्दी झाली होती. 

कळंब (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. चार) आणि रविवारी (ता. पाच) जनता कर्फ्यू लागू केला होता. त्यामुळे शहरातील भाजी बाजार बंद होता. सोमवारी (ता. सहा) पालिकेने मुख्य बाजारपेठेसह तांदुळवाडी रस्त्यावर बाजार भरविला अन्‌ बाजारात नागरिकांनी भाजी खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला. पालिकेचे नियंत्रण नसल्याने अनेकांनी टीकेची झोड उठविली आहे.

उमरगा तालुक्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने कळंब तालुका हादरून गेला आहे. प्रत्येक नागरिक, कुटुंबे सतर्क झाली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. आवाहनाला तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलिस व महसूल प्रशासनाने जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने कडेकोट अंमलबजावणी करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची झळ कळंब तालुक्यातील जनतेला बसू नये, यासाठी प्रशासनाडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात कोरोना कक्षाची स्थापना करण्यात आली असून शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल, सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते डोळ्यांत तेल घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे कोरोना विषाणूपासून कळंब तालुका कोसो दूर असून, सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. पालिकेने सोमवारी भरविलेल्या भाजीपाला बाजारमुळे नागरिकांनी तुफान गर्दी केल्याने गालबोट लागले आहे. 

हेही वाचा- धक्कादायक घाटी रुग्णालयात ब्रदरला कोरोनाची लागण

गर्दी होऊ न देता भाजीपाला विक्री करावी, असे प्रशासनाकडून वारंवार पालिकेला सूचना देण्यात येत आहेत. मात्र पालिकेतील काही हुशार मंडळी प्रशासनाच्या सूचनेला बगल देत असून बाजार भरविण्यावर ठाम असल्याचे यावरून दिसून येत आहे. जनता कर्फ्युमुळे दोन दिवस भाजीपाला विक्री करता आली नाही.

सकाळी साडेआठपर्यंत तुरळक गर्दी होती. बाजार सुरू असल्याची बातमी मिळाल्यानंतर नागरिकांची गर्दी उसळली. दुकानादारांनी मात्र सोशल डिस्टसिंगचे पालन करीत ग्राहकांना किराणा उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले. 

शहरातील लोकसंख्येचा विचार करून पालिकेने प्रभागनिहाय बाजार भरविण्याचे नियोजन केल्यास गर्दी टळणार आहे. मात्र पालिकेकडून असे नियोजन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 
- हर्षद अंबुरे, अध्यक्ष, रोटरी क्लब 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about kalamb city