जातिभेद कमी व्हावा, ही संघाची शिकवण - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

उस्मानाबाद - 'माणूस जातीने नव्हे, तर त्याच्या गुणाने मोठा असतो. त्यामुळे जातिभेद कमी व्हावा, हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

उस्मानाबाद - 'माणूस जातीने नव्हे, तर त्याच्या गुणाने मोठा असतो. त्यामुळे जातिभेद कमी व्हावा, हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या एकलव्य विद्या संकुलाचा रौप्यमहोत्सवी समारोप कार्यक्रम मंगळवारी झाला. या वेळी गडकरी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या वेळी उपस्थिती होती. तत्पूर्वी, सांगवी (मार्डी, ता. तुळजापूर) येथील प्रतिष्ठानच्या विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह सुरेश जोशी, हिंदुत्व अभियानाचे प्रणेते लाहिरी गुरुजी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यमगरवाडी येथे गडकरी म्हणाले, की आदिवासी मुलांकडे नैसर्गिकरीत्या उत्तम गुणवत्ता असते, त्यांना वाव दिला जावा. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचा गौरवही त्यांनी केला. फडणवीस म्हणाले, की देशात कल्याणकारी राज्याची निर्मिती झाली. पण शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोचला नाही. वंचित घटकांसाठी यमगरवाडी येथील भटके विमुक्त प्रतिष्ठानचा प्रकल्प चांगले काम करीत आहे. यमगरवाडीच्या प्रकल्पासाठी दोन कोटींचा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी जाहीर केले.

मंत्रीही व्यासपीठासमोर
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार असल्याने सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, कामगार कल्याण, कौशल्यविकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचीही या कार्यक्रमात हजेरी होती. परंतु या दोन्ही मंत्र्यांना व्यासपीठावर स्थान दिले नसल्याने त्यांना व्यासपीठासमोर बसावे लागले.

Web Title: osmanabad news marathwada news cast rss niti gadkari