उस्मानाबाद जिल्ह्यात कंटेनरखाली तीन म्हशी चिरडल्या, सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

भगवंत सुरवसे 
Sunday, 24 January 2021

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून महामार्गाचे रूंदीकरण झाल्यामुळे भरधाव वाहनामुळे अपघात घडत आहेत.

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्गजवळील (जि.उस्मानाबाद) आपल घर येथील घाटात रविवारी (ता.२४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडे जाणाऱ्या कंटेनरच्या (एमएच ४६ एआर ३२३०) चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर पलटी झाला. या अपघातात नळदुर्ग येथील पशुपालक मच्छिंद्र जाधव यांच्या मालकीच्या तीन म्हशी चिरडून ठार तर एक म्हैस जखमी झाली. तसेच पाठीमागून येणारी कार (केए ५३ एमसी ३६५५) पलटलेल्या कंटेनरवर आदळली. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन तास वाहतूक कोंडी  झाली होती.

औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून महामार्गाचे रूंदीकरण झाल्यामुळे भरधाव वाहनामुळे अपघात घडत आहेत. रविवारी दुपारनंतर राष्ट्रीय महामार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नळदुर्गचा आठवडे बाजार असल्यामुळे  गर्दी होती. अशातच पर्यटकांची वाहने यामुळे गोंधळ उडाला. राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाल्यामुळे अनेक वाहन चालकांनी वाहने शहरातून घुसवण्यचा प्रयत्न केल्यामुळे बाजारसाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

दरम्यान नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक जगदीश राऊत व महामार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत कवले यांनी पोलीस ताफ्यासह वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले व खंडोबा रोड मार्गे वाहने पाठवून पुढे मुर्टा पाटीमार्गे महामार्गाकडे वळती केले.

 

संपादन  - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News Naldurg Container Crushed Buffaloes