कुठे हलका पाऊस, तर कुठे हुलकावणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्‍यात आली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना गुरुवारी (ता.१३) शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र काही मिनिटे रिमझिम बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली. आतापर्यंत ७७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीनंतर मात्र पावसाने दडी मारली. पिकांची उगवण चांगली झालेली असताना व त्याला पाण्याची गरज असतानाच पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गुरुवारी दुपारनंतर शहर व जिल्ह्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी व नागरिक बाळगत होते. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शहरासह परिसरात रिमझिम पावसाला सुरवात झाली. १५ ते २० मिनिटे हा पाऊस झाला. परंतु पिके जगविण्यासाठी तो पुरेसा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दरम्यान, परंडा शहरासह तालुक्‍यातील अनाळा परिसरातही हलका पाऊस झाला. भूम तालुक्‍यातील वालवड परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. उमरगा शहर परिसरात सकाळी आणि त्यानंतर सायंकाळी काही मिनिटे रिमझिम पाऊस झाला. परंतु जिल्ह्याच्या उर्वरित भागात पावसाने हुलकावणी दिली.

Web Title: osmanabad news rain