खासगी रुग्णालयात उपचार मोफत की, महागडे

अविनाश काळे
सोमवार, 6 एप्रिल 2020

जिल्हा प्रशासनाच्या आदेशातील अधिग्रहित सेवेबाबत स्पष्टता नसल्याने खासगी उपचार मोफत की, महागडे याबाबत संभ्रम आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन व्यक्ती आढळून आल्याने प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. पाच) शहरासह तालुक्यातील खासगी रुग्णालयाची सेवा अधिग्रहित करण्याबाबत आदेश काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र आदेशातील अधिग्रहित सेवेबाबत स्पष्टता नसल्याने खासगी उपचार मोफत की, महागडे याबाबत संभ्रम आहे.

उमरगा तालुक्यातील एका गावात एक तर शहरात एक व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर लोहारा तालुक्यातही एक व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आली आहे. या तीन व्यक्तींवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब रुग्णालयात घेण्यात येत आहेत. त्यामुळे या रुग्णालयात अन्य आजारावरील औषधोपचार व तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता आहे.

उपजिल्हा रुग्णालय सध्या कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथे अन्य आजारावरील उपचार आता खासगी रुग्णालयात होतील. रुग्णालयाच्या इमारती, तेथील वैद्यकीय उपचाराची उपकरणे, डॉक्टर्स, कर्मचारी, रुग्णवाहिका यांची सेवा अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ-मुंढे यांनी काढले आहेत. या संदर्भात रविवारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत मोरे यांच्यासह डॉक्टर्सच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत अधिग्रहित या शब्दावर बरीच चर्चा झाली.

हेही वाचा- धक्कादायक घाटी रुग्णालयात ब्रदरला कोरोनाची लागण

खासगी रुग्णालयातील सेवेबाबत मात्र स्पष्टतेचा मार्ग निघाला नाही. दरम्यान सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या प्रसूती अथवा सिझेरियन आता खासगी रुग्णालयात होणार असतील तर त्याचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. तो द्यायचा की नाही, याबाबत संदिग्धता आहे. सोमवारी काही रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात आले होते, मात्र त्यांना खासगी रुग्णालयाचा मार्ग दाखवण्यात आला, तेथे नियमित चार्जेस घेण्यात येत आहेत. 

उपजिल्हा रुग्णालय खास कोरोनाग्रस्तासाठी करण्यात आले आहे. तेथे असलेल्या रुग्णांचा संसर्ग अन्य रुग्णाला होऊ नये म्हणून खासगी रुग्णालयातील उपचाराचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तेथील खर्चाबाबत खासगी डॉक्टर्सनी विचारणा केली होती. सामान्य कुटुंबातील रुग्णांना थोडी सवलत असावी असे स्पष्ट केले होते. या आदेशाची अंमलबजावणी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी केली आहे, यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. लवकरच या आदेशाची स्पष्टता होईल. 
- विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी. 

खासगी रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी खुली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील अधिग्रहित या शब्दातून रुग्णसेवा मोफत द्यायची की त्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकार देणार याबाबत स्पष्ट होत नाही. खासगी रुग्णालयात सेवा देताना बराच खर्च आहे, कर्मचारी, महागडे उपकरणे यामुळे मोफत उपचार शक्य होणार नाही. सामान्य कुटुंबातील लोकांच्या उपचाराचा खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. बैठकीत उपचाराच्या खर्च घेण्याबाबत स्पष्ट झाले नाही, त्यातील स्पष्टता होणे अपेक्षित आहे. 
- डॉ. प्रशांत मोरे, सचिव, आयएमए, उमरगा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Private hospital treatment is free or expensive