अहवाल निगेटिव्ह आल्याने उस्मानाबादकरांना दिलासा

तानाजी जाधवर
गुरुवार, 26 मार्च 2020

जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यांतून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन, तसेच आरोग्य विभागावर दररोज ताण वाढत असल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचा एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी (ता. २४) पाठविलेल्या काही जणांचे स्वॅब अहवालसुद्धा निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी (ता. २५) दोनजणांचे स्वॅब घेण्यात आले असून, गुरुवारी (ता. २६) रात्री ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ५९ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत.

जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यांतून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन, तसेच आरोग्य विभागावर दररोज ताण वाढत असल्याचे चित्र आहे. नोंदणी केल्याप्रमाणे सोमवारपर्यंतचा आकडा जवळपास पंधरा हजारांवर होता. तर तोच आकडा बुधवारपर्यंत ४१ हजारांवर गेला आहे. त्यावरून कोरोना विषाणूंचा धोका जिल्ह्यामध्ये बळावणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत असले तरी त्यातील एकही जण आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे बाधित नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

२४ मार्च रोजी नऊजणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यांचाही अहवाल येणे बाकी होते. तो अहवाल बुधवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्यातही ते सगळे अहवाल निगेटिव्ह आल्याने नक्कीच धोका टळल्याचे बोलले जात आहे. सध्यातरी जिल्ह्यामध्ये विषाणूचा शिरकाव झाला नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यामध्ये क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची संख्या दररोज सरासरी पन्नास ते साठ एवढी असून, ती संख्या मात्र अद्याप कमी झालेली दिसत नाही.

संचारबंदीचा चांगला परिणाम आता पाहायला मिळत आहे. लोक आता कामाव्यतिरिक्त बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. यामध्ये ग्रामीण भागामध्येही नागरिक सजग झाल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला जे लोक विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत त्यांनाही पोलिसांकडून चांगलीच समज दिली जात आहे. काही ठिकाणी तर पोलिसांनी बळाचाही वापर करण्यास सुरवात केली आहे. साहजिकच अशा लोकांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश मिळाल्याचेही दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Relieves The Report With Negative Results