जरबेरा फुलांवर फिरवला रोटाव्हेटर

वैभव पाटील
सोमवार, 6 एप्रिल 2020

संचारबंदीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प असून, वाहतूक बंद केल्याने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलांचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

नायगाव (जि. उस्मानाबाद) : कोरोना व्हायरसने देशात घातलेल्या थैमानामुळे फुलशेती करणारे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पॉलिहाऊसमध्ये जनावरे सोडावी लागत आहेत. त्यानंतर रोटाव्हेटर फिरवून जरबेराची फुलशेती मोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

संचारबंदीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प असून, वाहतूक बंद केल्याने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलांचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा - हिंगोलीत लॉकडाउन; रस्त्यांवर शुकशुकाट

नायगाव (ता. कळंब) परिसरातील नायगाव, पाडोळी, बोरगाव, रायगव्हण, पिंपरी परिसरात ३० पॉलिहाऊस असून, शेतकऱ्यांनी कर्ज काढून ती उभी केली आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने जरबेरा फुलांना मागणीच राहिली नाही. फुले नाशवंत असून जास्त काळ टिकत नाहीत. नायगावसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलांत पशू सोडून रोटाव्हेटर फिरवून फुलशेती मोडीत काढली आहे.

 
एका पॉलिहाऊसमधून दिवसाला २५० फुलांचे बंडल बांधून विक्रीसाठी पाठविली जातात. प्रतिफूल किमान तीन रुपयांप्रमाणे भाव मिळतो. त्यानुसार दिवसाचे साडेसात हजार रुपयांचे नुकसान एका शेतकऱ्याचे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

आधुनिक पद्धतीने शेती करीत शेतात फुलशेतीचा प्रयोग केला. त्यासाठी कर्ज घेऊन पॉलिहाऊस उभा केले. त्यात जरबेरा फुलांची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाला, चांगले उत्पन्न मिळू लागले होते; मात्र आता कोरोनामुळे मागणी घटल्याने जरबेरा फुलांचा चारा म्हणून वापर करावा लागत आहे. 
- सुधाकर शितोळे, फूल उत्पादक, नायगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Rotavator rotated on the Jarbera flowers