हिंगोलीत लॉकडाउन; रस्त्यांवर शुकशुकाट

Hingoli shukshukat
Hingoli shukshukat

हिंगोली : जिल्‍ह्यात तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून तीन दिवस औषधी दुकानांव्यतिरीक्त इतर दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली. नागरिकांनाही लॉकडाउनचे महत्त्व समजल्याने स्वत:हून घरात थांबण्यास पसंती दिली. त्यामुळे तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. पाच) शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. तसेच मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने बाहेरगावांतील व इतर नगरांतील नागरिकांना प्रवेश दिला जात नव्हता.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह, आरोग्य विभाग, पोलिस विभाग विविध उपाययोजना राबवित आहे. कोरोना संपर्कातील व्यक्तीपासून लांब राहता यावे, यासाठी सावधगिरी म्हणून नगरातील रस्ते काट्या, बांबू टाकून बंद केले आहेत. 

घरात राहण्यास पसंती

शहरातील कालीमातानगर, गाडीपुरा, वंजारवाडा, शास्त्रीनगर, बांगरनगर, कोमटी गल्ली, गोलंदाज गल्ली, चिंतामणी गणपती मंदिर परिसर, लाला लजपतराय नगर, सरस्‍वतीनगर आदी भागातील रस्ते नागरिकांनी बंद केले होते. औषधी दुकाने वगळता रविवारीदेखील सर्व व्यवहार बंद होते. नागरिकांहीही लॉकडाउन पाळत घरात राहण्यास पसंती दिली. 

गरजूंना केले जातेय अन्नदान

पोलिस प्रशासन सतत शहरात व इतर ठिकाणीदेखील ध्वनिक्षेपकावरून घराबाहेर निघू नका, असे आवाहन नागरिकांना करीत आहेत. आरोग्य कर्मचारीदेखील सतर्क असून घरपोच सेवा देत आहेत. शहरात अनेक ठिकाणी गरजूंना अन्नदान केले जात आहे. यात सामाजिक कायकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध संस्‍था, मंडळे, व्यापारी, विविध मंदिराचे पदाधिकारी, पोलिस प्रशासनदेखील सहभागी झाले आहे.

औढ्यात रस्त्यावर शुकशुकाटच

औंढा नागनाथ : जिल्‍ह्यात संचारबंदी लागू असतानाही शहरात अनेक नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी दोन दिवसांपासून या बाबत कारवाईची मोहीम हाती घेतल्याने रविवारी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. शहरासह गल्लीबोळांमधील रस्तेदेखील निर्मनुष्य दिसत होते. कोणीही घराच्या बाहेर निघण्यास तयार नव्हते. त्यामुळे येथील उपबाजार समितीमधील सर्व दुकाने बंद असून येथेही शुकशुकाट दिसत होता.

अत्यावश्यक सेवेतील वगळता इतर वाहनांचा मनाई

हिंगोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच वेळापत्रकदेखील निश्चित करून देण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना (ता.१४) पर्यंत मनाई करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.


जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

 संचार बंदीच्या काळामध्ये शासकीय वाहन, वैद्यकीय कारणास्तव परवानगी घेतलेली वाहने, अत्यावश्यक सेवा पुरवठा करण्यासाठी परवानगी घेतलेली वाहने आणि अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी, कर्मचारी (कार्यालयीन ओळखपत्र असलेले) यांची वाहने सोडून इतर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना रस्त्यावर फिरण्याकरिता (ता. १४) एप्रिलच्या रात्रीपर्यंत सक्त बंदी करण्यात आली आहे.

पूर्व परवानगीने प्रवास करता येईल

वैद्यकीय आपात्काल (मेडिकल इमर्जंन्सी) असल्यास आरोग्य विभागाची रुग्णवाहिका टोल फ्रि क्र. १०८, १०२ वर संपर्क करून मागवावी. इतर आपात्कालीन परिस्थितीत खासगी वाहनाने प्रवास करावयाचा असल्यास पोलिस नियंत्रण कक्ष यांचा टोल फ्रि क्रमांक १०० वर संपर्क साधून किंवा जिल्हा तसेच तालुकास्तरावर चोवीस तास स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षावर संपर्क करून पूर्व परवानगीने प्रवास करता येईल. त्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित तालुका नियंत्रण कक्ष येथे संपर्क करावा लागणार आहे.

 नियमांचे पालन करावे

संचारबंदी कालावधीमध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये घराबाहेर फिरतांना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंड सहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असणार आहे. तसेच संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com