गावोगावची ज्ञानमंदिरे बनली क्वारंटाइन कक्ष

file photo
file photo

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश गावांतील ज्ञानमंदिरे आता क्वाइंटाइनची ठिकाणे झाली आहेत. ग्रामीण भागात परजिल्हा, परराज्यातून आलेल्यांना चौदा दिवस क्वारंटाइन करण्यासाठी शाळांच्या इमारतींचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे उन्हाळी सुटीत दरवर्षी कुलूपबंद असलेल्या शाळा आता परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे गजबजलेल्या आहेत.

देशात, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाउन करण्यात आले. व्यवसाय, नोकरी, कामधंद्यानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातून पुणे, मुंबई यांसारख्या शहरी भागात गेलेले नागरिक त्या-त्या शहरातील कंपन्या, व्यवसाय बंद असल्यामुळे संबंधित शहरातच अडकून पडले. त्यानंतर काही नागरिकांनी आपल्या मूळ गावाकडे येणे पसंत केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्यामुळे परराज्य, परजिल्ह्यातून आपल्या मूळ गावी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. यातील बहुतांश नागरिक कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून येत आहेत. अशा नागरिकांमुळे गावात आल्यानंतर कोरोनाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांना किमान चौदा क्वारंटाइन केले जात आहे. गावात प्रवेश करताच कोरोना सहायता कक्षामध्ये अशा नागरिकांची नोंद करून त्यांना क्वारंटाइनसाठी शाळेच्या इमारतीमध्ये पाठविले जात आहे.

बहुतांश ग्रामीण भागात सुस्थितीत असलेल्या शाळांची इमारतच क्वारंटाइनसाठी निवडण्यात आली आहे. त्यामुळे सुटीच्या काळातही शाळा अशा नागरिकांमुळे गजबजलेल्या आहेत. ग्रामीण भागात काही गावांत सातवीपर्यंत, तर काही भागात दहावीपर्यंतचे वर्ग आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एका शाळेच्या इमारतीमध्ये सात ते दहा वर्गखोल्या आहेत. या वर्गखोल्यांमध्ये परजिल्हा, परराज्यातून आलेल्या लोकांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींचा निवास आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळी सुटीत दीड महिना ओस पडणाऱ्या शाळांच्या वर्गखोल्या अशा नागरिकांमुळे सध्या गजबजून गेल्या आहेत.

गावातील मुला-मुलींना सुसंस्कारित, सुशिक्षित करण्यासाठी व देशाचा भावी नागरिक घडविण्यासाठी गावोगावी उभारलेल्या शाळा इमारतीमध्ये नागरिकांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोरोनाने प्रशासनावर व गावपातळीवरील जबाबदार नागरिकांवर आणली आहे. ज्यांनी कधीही शिक्षणासाठी शाळेची पायरी चढली नाही, अशांना नाइलाजास्तव का होईना १४ दिवस शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये दिवस काढण्याची वेळ कोरोनाने आणली आहे.

उन्हाळी सुटीमध्ये विवाहकार्यासाठी, या कार्याला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी शाळेच्या इमारतीचा वापर केला जात असे. कारण गावातील सार्वजनिक इमारत, अशी या शाळा इमारतींची ओळख आजही आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com