उमरग्यातून नव्याने सोळा जणांचे स्वॅब पाठविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

शहरात सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाचे आठ पथक नेमण्यात आले आहेत. दरम्यान, होम क्वारंटाइन व्यक्तींची पुन्हा तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहर व तालुक्यातील एका गावात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचा थरकाप उडतो आहे. प्रशासनाकडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचे, नातेवाईकांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.

परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती, उमरगा तालुक्यातील दोन व लोहारा तालुक्यातील एका पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक व संपर्कातील व्यक्ती असे २१ मार्चपासून तीन एप्रिलपर्यंत ७६ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ६८ जणांना होम क्वॉरंटाइन केले होते. त्यातील पाच जण शहरातील तर ६२ जण ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान सोमवारी (ता. सहा) उमरगा शहरातून नव्याने १६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा- धक्कादायक घाटी रुग्णालयात ब्रदरला कोरोनाची लागण

शहर व तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती, जनता कर्फ्यू तसेच प्रत्येकांनी घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे. ३१ मार्चपर्यंतच्या तपासणीत सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते,

मात्र एक एप्रिलपासून मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आणि प्रशासन कामाला लागले. त्यात शहरातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगत उपाययोजना सुरू केली. नागरिकही सावधगिरी बाळगत गल्लोगल्ली जागृती करीत गल्लीच्या सीमा बंद केल्या. 

सोळा जणांचे स्वॅब पाठविले तपासणीला 
शहरातील त्या तरूणाच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब रविवारी (ता. पाच) पाठविण्यात आले होते तर सोमवारी (ता. सहा) १४ जणांचे आणि उर्वरित एका गावातील दोन असे १६ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्या चार जणांचा अहवाल सोमवारी रात्री येणार होता. दरम्यान सोमवारी या २० जणांना बहुजन हिताय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. 

शहरात आरोग्य विभागाचे आठ पथक 
शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यासाठी आठ आरोग्य विभागाच्या पथकामार्फत वार्डनिहाय फिरून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची विचारपूस करण्याचे काम सुरू केले आहे. कोरोनासंबंधी लक्षणे जाणवू लागलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी केली जाणार आहे. शहरातील त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या गल्लीवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. 

होम क्वारंटाइन केलेल्या २० व्यक्तींचा १४ दिवसांचा कालावधी संपला आहे. त्यांच्यावरील देखरेख आता कमी होईल, शिवाय होम क्वारंटाइन केलेल्या अनेक जणांचा कालावधी वरचेवर संपणार आहे, मात्र त्यांची पुन्हा तपासणी करून स्वॅब घेण्यात आले तर कोरोनासंबंधीची कीड जाऊ शकते. या बाबतीत महसूल, आरोग्य विभाग किती दक्ष राहणार आहे यावर बरेच बरेच अवंलबून आहे. 

"त्या" तरुणाच्या पोरकटपणाची होतेय चर्चा 
एका गावातील पॉझिटिव्ह तरूणावर उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. त्याचे वागणे बऱ्याच जणांना खटकणारे आहे. खिडकीजवळ येऊन खाली थुंकणे, नातेवाईकांशी बोलत राहणे, या बाबी समोर येत आहेत. रूग्णालय प्रशासनही या बाबी पाहून हतबल झाले आहे. असे कृत्य करणे कितपत योग्य आहे, याबाबत चर्चा होत असून, महसूल व पोलिस प्रशासनाकडून याची दखल घ्यायला हवी अशी मागणी होत आहे. 

शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आठ पथकांकडून लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. ज्या व्यक्तींची लक्षणे कोरोनाशी संबंधित आहेत, त्या सर्वांचे स्वॅब घेण्यास आरोग्य विभाग सक्षम आहे. लक्षणे दिसू लागल्यास संबंधित लोकांनी स्वतःहूनही रुग्णालयात येऊन तपासणी करावी. जेणेकरून शहरात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. 
- डॉ. प्रवीण जगताप, आयसोलेशन कक्षप्रमुख, उपजिल्हा रुग्णालय, उमरगा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Sixteen new members sent a swab