गावाची ओढ : तळपते उन्ह झेलत सुरु आहे त्यांची पायपीट

उमरगा : पायपीट करीत निघालेले कर्नाटकातील नागरिक.
उमरगा : पायपीट करीत निघालेले कर्नाटकातील नागरिक.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या परराज्यातील लोकांना राज्य सरकारने परतीचा मार्ग खुला केला असला तरी त्यांना गावापर्यंत पोचवण्याचे नियोजन कोलमडल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.

वाहनांची सोय नसल्याने परराज्यातील अनेक मजूर जीव धोक्यात घालून शेकडो किलोमीटर पायपीट करीत गावाच्या दिशेने निघाल्याचे चित्र कायम आहे. गवंडी काम करणारे कर्नाटकातील आठ जण चिमुकल्या तिघांना घेऊन अशीच पायपीट करीत निघाल्याचे चित्र शनिवारी (ता. नऊ) सकाळी साडेदहाच्या सुमारास येथे दिसले. 

चंदनकेरा (ता. चिंचोळी, कर्नाटक) येथील बंजारा समाजातील रवी जाधव, दिनेर जाधव उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह कल्याण येथे गेल्या तीन वर्षांपासून गवंडी कामासाठी राहत होते. मुंबईसह उपनगरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चंदनकेरा येथील पंधरा जण २९ मार्चला खासगी वाहन भाड्याने घेऊन गावाकडे निघाले होते. इंदापूरला पोलिसांनी अडवले. प्रशासनाने खर्डेवाडी येथे त्यांची राहण्याची, जेवणाची सोय केली. सुमारे ३५ दिवस त्यांना हलता आले नाही.

तिसऱ्या लॉकडाउनमध्ये परराज्यातील लोकांना गावाकडे जाण्याची मुभा देण्यात आली, त्यांच्यासाठी विशेष रेल्वे अथवा बसची व्यवस्था असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी महसूलकडे नोंदणी सुरू झाली; मात्र जाण्यासाठी कुठलाही मार्ग दिसत नसल्याने रवी जाधव, दिनेर जाधव यांनी पत्नी, लेकराबाळांसह पायी जाण्याचा निर्णय घेतला.

पाच मे रोजी सकाळी ते गावाकडे निघाले. सोबत तीन लहान मुले. त्यांना चालणे असह्य होत असल्याने खांद्यावर, कडेवर घेऊन पालकांची मजलदरमजल सुरू आहे. सोबत आणलेल्या सुकलेल्या भाकरी, लाल तिखटाचा काला करून पोटाची भूक भागवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज सकाळी जाधव यांचे कुटुंब शहरात आले.

येथून कर्नाटकाची सीमा वीस किलोमीटरवर असल्याने पोलिस अडवतील या भीतीने ते मधल्या मार्गाची विचारणा स्थानिकांकडे करीत होते. काहींनी मार्ग सांगितलाही पण नेमका अंदाज न आल्याने त्यांनी महामार्गानेच पायपीट सुरू ठेवली. चालून चालून महिलांच्या पायाला फोड आले होते. तरीही गावाकडच्या ओढीने तळपते उन्ह झेलत त्यांचा पायी प्रवास सुरू असल्याचे दिसले. 

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तेथून हलण्याचे नियोजन केले. खासगी वाहनाने इंदापूरपर्यंत आलो. पोलिसांनी अडवल्याने तब्बल महिना तेथे राहिलो. गावाकडे जाण्यासाठी वाहनांची सोय होईल, अशी आशा होती. ती फोल ठरल्याने कुटुंबासह पायी जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास कठीण आहे; पण काही पर्याय नसल्याने वेदनांचे ओझे सहन करीत निघालोत. 
- रवी जाधव, चंदनकेरा (कर्नाटक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com