तेलंगणाचे मजूर कुटुंबिय रात्रीतून जाताहेत निघून

अविनाश काळे
Tuesday, 14 April 2020

लॉकडाऊनमुळे प्रवासात अडकून पडलेल्या तेलंगणाच्या ४६५ मजूर कुटुंबाची राहण्यासह जेवणाची सोय प्रशासनाकडून गेल्या १५ दिवसांपासून केली जात आहे. मात्र लॉकडाऊन वाढल्याने लोकांची मानसिकता बदलली आहे.

उमरगा : लॉकडाऊनमुळे प्रवासात अडकून पडलेल्या तेलंगणाच्या ४६५ मजूर कुटुंबाची राहण्याची व जेवणाची सोय प्रशासनाकडून गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने आणखी किती दिवस या ठिकाणी राहायचे अशा मानसिकतेत असलेल्या काही कुटुंबातील व्यक्ती शनिवारी (ता. ११) रात्रीतून गावाकडे परतल्याची माहिती रविवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली आहे. मात्र त्यांची निश्चित संख्या प्रशासनाकडे नाही.

तेलंगणाचे मजूर कामासाठी मुंबईला गेले होते. लॉकडाऊनमुळे ते गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्यातच अडकले. पहिल्यांदा त्यांची राहण्याची मानसिकता नव्हती. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी जाण्यासाठी कोणतेही मार्ग नाहीत, असे सांगून त्यांची समजूत काढली. तसेच औद्योगिक वसाहतीत ४६५ जणांची राहण्यासह जेवणाची सोय केली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा    

गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासनाने तेथे तपासणीसाठी आरोग्य कर्मचारी, सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी नेमले आहेत. मात्र लॉकडाऊनचा कार्यकाळ अनिश्चित असल्याने मजूरांच्या कुटुंबांची तेथे राहण्याची मानसिकता दिसत नाही. अशी दोन दिवसांपासूनची स्थिती होती. शनिवारी मध्यरात्री काही कुटुंब निवाऱ्याच्या मागच्या बाजूने पायी गेल्याची बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. सोमवारी (ता. १३) दुपारी ही काही जण निघून गेल्याचे वृत्त आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. 

मजुरांच्या कुटूंबातील व्यक्तींची प्रशासनाकडून राहण्याची, जेवणाची सोय केलेली आहे. काही लोकांची राहण्याची मानसिकता नाही. प्रशासनाने त्यांच्यासाठी आरोग्य, पोलिस यंत्रणा तेथे तैनात केली आहे. काही लोक तेथून रात्रीतून निघून गेल्याची माहिती पोलिसाकडून मेलद्वारे प्राप्त झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. 
- संजय पवार, तहसीलदार, उमरगा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Telangana laborers' families leave at night