शेकडो किलोमिटरचे अंतर केले पार, मजुरांनी गाठले गाव

जावेद इनामदार
Wednesday, 13 May 2020

मंटकी तांडा (ता. आळंद, कर्नाटक राज्य) येथील जवळपास ३० मजुरांनी सोमवारी (ता. ११) राज्याची सीमा पार करीत आपले गाव गाठले.

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस मुंबई, पुण्यात अधिक घट्ट होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने अनेक मजुरांनी गावचा रस्ता धरला आहे. मिळेल ते वाहन अथवा पायीच निघून आपले गाव जवळ करीत आहेत. मंटकी तांडा (ता. आळंद, कर्नाटक राज्य) येथील जवळपास ३० मजुरांनी सोमवारी (ता. ११) राज्याची सीमा पार करीत आपले गाव गाठले.

पुणे मुंबईत कोरोनाने कहर केला असून, प्रत्येक मजूर व कामगार काही करुन आपले गाव गाठत कोरोनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. कामानिमित्त कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमावर्ती गावातील अनेक कामगार व मजूर मुंबई, पुण्यात स्थायिक झाले होते. अनेक वर्षे काम करुन आपला उदरनिर्वाह चालविला.

हेही वाचा - गावी परतल्याच्या आनंदाने मजूर गहिवरले... 

आता मात्र कोरोनामुळे त्यांनी पुन्हा गावचा रस्ता धरला आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बुडाला. अनेकांचे रोजगारही गेल्याने त्यांना आपल्या गावांची ओढ लागली आहे. गेल्या दीड महिन्यापांसून लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर गावी जाऊ या आशेने प्रत्येक जण शहरी भागात अडकून पडले आहेत.

हेही वाचा - मोंढा गजबजला हळद, हरभऱ्याची आवक वाढल्याने...  

आता तिसरे लॉकडाऊन संपण्यापुर्वीच चौथे लॉकडाऊन सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मुंबई, पुणे शहरातून मजूर व कामगार काही करुन आपले गाव गाठत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील चार रस्त्यावरुन अनेक मजूर नाकाबंदी तोडून पायी चालत आपले गाव गाठत असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या चार दिवसांत मुंबई पुण्यातील हजारो कामगार छुप्या पद्धतीने आपले गाव गाठण्यात यशस्वी झाले आहेत. आळंद तालुक्यातील मंटकी तांडा येथील ३० कुटूंबीयांनी पुण्याहुन लेकरांबाळासह तीनशे किलोमीटरची पायपीट करीत सोमवारी आपले गाव गाठले. यापूर्वीही तेलंगणा व कर्नाटकातील काही मजुरांनी छुप्या मार्गाने तर काहींनी परवानगी काढून अखेर आपले गाव गाठले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The village reached by the laborers